कोल्‍हापूर : धुवाँधार पावसामुळे दूधगंगेला पूर; बाचणी धरण भरले, वाहतूक पूर्णपणे बंद | पुढारी

कोल्‍हापूर : धुवाँधार पावसामुळे दूधगंगेला पूर; बाचणी धरण भरले, वाहतूक पूर्णपणे बंद

बिद्री : पुढारी वृत्तसेवा शुक्रवारी सायंकाळपासून कागल तालुक्याच्या पश्चिम भागात धुवाँधार पाऊस पडत आहे. दूधगंगा नदीला पूर आला आहे. बाचणी धरण भरले असून, वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाउस कोसळत आहे. यामुळे शेत शिवारात पाणीच पाणी झाले आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत दूधगंगा नदी दुथडी भरून वहात होती. शुक्रवारी रात्री व शनिवार धुवाँधार पावसाने परिसराला झोडपून काढले आहे. यामुळे दिवसभर जनजीवन विस्कळित झाले. धरणक्षेत्रात तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. याचा परिणाम दूधगंगा नदीला पूर येवून पाणी पात्राबाहेर आल्‍याने दोन्ही बाजूच्या शिवारात पाणी शिरले आहे.

या पुरामुळे बाचणी धरण पूर्ण भरले आहे. यामुळे कोल्हापूरकडील होणारी वहातूक थांबली आहे. दूधगंगा नदीवरील काळम्मावाडी धरण अजून भरले नसल्यामुळे अद्याप पाणी सोडलेले नाही. केवळ पावसाच्या पाण्यामुळे बाचणी धरणाची उंची कमी असल्यामुळे धरणावर पाणी आले. वाहतूक बंदीचा फटका विद्यार्थी व नोकर वर्गाला बसला आहे. त्यांना आता खेबवडे किंवा कागल मार्गे कोल्हापूरला जावे लागत आहे. यामुळे वेळेचा व पैशाचा अपव्यय होत आहे. शनिवारी कागल पोलीसांनी धरणाला भेट देवून पाहणी केली. धरणावरून पाण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावर आडवी लाकडे लावून वाहतूक थांबवली आहे. नागरिकांनी जीव धोक्यात घालून धरणाच्या पाण्यातून जावू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button