सिंहीण खाते झाडाचा पाला! | पुढारी

सिंहीण खाते झाडाचा पाला!

नवी दिल्ली ः कधी कधी आपल्याला अत्यंत अनपेक्षित अशी द़ृश्ये पाहायला मिळत असतात. अशाच एका द़ृश्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सिंह म्हणजेच ‘जंगलाचा राजा’ इतर प्राण्यांचे मांस खाऊन आपली भूक भागवतो. मात्र, तुम्ही कधी सिंहाला झाडाची पाने, गवत खाताना पाहिलं आहे का? आपण लहानपणीपासूनच असं ऐकलं आहे, की सिंह हा मांसाहारी प्राणी आहे आणि इतर प्राण्यांची शिकार करून तो आपलं पोट भरतो. मात्र, या व्हिडीओमध्ये एक सिंहीण चक्क झाडाची पाने खाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल. मात्र, यामागचे कारण आणखीच रंजक आहे.

भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, होय – सिंह कधी कधी गवत आणि पाला खातात. हे आश्चर्यकारक वाटू शकतं, परंतु ते गवत आणि पाने का खातात? यामागे अनेक कारणे आहेत. जेव्हा जेव्हा त्यांच्या पोटात दुखतं तेव्हा पाणी पिण्याऐवजी त्यांना झाडाची पानं खायला आवडतं. त्यामुळे पोटदुखीपासून त्यांना आराम मिळतो. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक सिंहीण झाडाच्या फांद्या ओढून पानं खात आहे. अर्थातच हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. हा व्हिडीओ लगेच व्हायरलही झाला! आतापर्यंत तो 15 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत आणि अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, ‘गवत आणि पानं मांस पचण्यास मदत करतात, माझा कुत्रा पोटभर जेवूनही गवत खात असे. ईशान्येकडील लोक भरपूर मांस खातात, म्हणून ते हे मांस मसाल्यात शिजवत नाहीत तर वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्यांमध्ये शिजवतात. यामुळे मांस पचतं असं त्यांना वाटते.

Back to top button