नेवाशात मोकाट जनावरांची धरपकड | पुढारी

नेवाशात मोकाट जनावरांची धरपकड

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शहरात मुक्तसंचार करणार्‍या मोकाट जनावरांमुळे नागरिक हतबल झाले होते. नगरपंचायतीने बुधवारी या जनावरांची धरपकड मोहीम सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मोकाट जनावरांच्या मुक्तसंचाराबाबत ‘पुढारी’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर नगरपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले.

नगरपंचायतीने लगेच मोकाट जनावरांची धरपकड मोहीम हाती घेतली आहे. शहराच्या विविध भागांत मोकाट जनावरांचा सतत रास्ता रोको असतो. नागरिकांना विशेषतः महिलांना नेहमी त्रास होतो. बाजारतळावरही मोकाट जनावरांचा सुळसुळाट असतो. नगरपंचायतीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना याबाबत विविध संघटनांनी निवेदन देऊन लक्ष वेधले होते.

शहरातील श्रीरामपूर रोड, मोहिनीराज मंदिराजवळ, बाजारपेठ, बाजारतळावर, ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यावर ही जनावरे बिनधास्त फिरत असतात. गायी, गोर्‍हे, डुकरे आदी परिसरात असतात. मोकाट कुत्र्यांचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. कुत्र्याचा नेहमीच धुमाकूळ चालतो. एका कुत्र्याने मध्यंतरी अनेकांना चावा घेतला होता.

या परिस्थितीबाबत ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्याने नेवासा नगरपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले. बुधवारी सकाळपासून मोकाट जनावरांची धरपकड मोहीम सुरू केली. टेम्पोमध्ये मोकाट जनावरे पकडून नेली जात होती. या मोहिमेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पंरतू ही मोहीम सतत राबविली जाणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

हेही वाचा

नाशिक : सुचनेप्रमाणे काम न केल्याने 16 पोलिसांची दंगल नियंत्रण पथकात उचलबांगडी

मुंबई शहरसह उपनगरात मुसळधार, वाहतूक काेंडी

राज्यभर मुसळधार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाने उडवली दाणादाण

Back to top button