मुंबई शहरसह उपनगरात मुसळधार, वाहतूक काेंडी | पुढारी

मुंबई शहरसह उपनगरात मुसळधार, वाहतूक काेंडी

मुंबई :  मुंबई शहर व उपनगरात पाऊस सक्रिय झाला असून गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरशः मुंबईकरांना झोडपून काढले. बुधवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे घरांसह झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. यात काही वाहनांचेही नुकसान झाले. रेल्वेसह बेस्ट, टॅक्सी, रिक्षा या प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. जोरदार पावसाच्या इशार्‍यामुळे अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना दुपारीच घरी सोडले.

छत कोसळून पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू

भांडुप पश्चिमेकडील सोनापूर, क्रॉस रोड पाच मजली झकेरिया इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील खोली नंबर 102 मधील छत बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कोसळला. यात तसिन शेख ही पाच वर्षाची मुलगी जखमी झाली होती. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण सायंकाळी तिचा मृत्यू झाला.

भिवंडीत मुलीचा मृत्यू

भिवंडीत बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसात सर्वत्र पाणी पाणी झालेले असताना शहरातील टेमघर येथील स्मशानभूमीनजीक नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. तेथून जात असलेली एक मुलगी या पाण्यात वाहून गेली. सुजाता बबन कदम (वय 14) असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.

यंत्रणांना मुख्यमंत्र्यांकडून निर्देश

राज्यात मुसळधार पाऊस होत असून, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली.

Back to top button