नाशिक : सुचनेप्रमाणे काम न केल्याने 16 पोलिसांची दंगल नियंत्रण पथकात उचलबांगडी | पुढारी

नाशिक : सुचनेप्रमाणे काम न केल्याने 16 पोलिसांची दंगल नियंत्रण पथकात उचलबांगडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुन्हेगारी नियंत्रणासाठी दिलेल्या सुचनांनुसार काम न केल्याने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार पोलिस दलातील १६ अधिकारी व अंमलदारांची तडकाफडकी दंगल नियंत्रण पथकात बदली केली आहे. अंमलदारांच्या कामकाजात सुधारणा होण्याच्या हेतूने या अंमलदारांना आता गुन्हे अन्वेषण तंत्राबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

गुन्ह्यांचा तपास, पुराव्यांचे संकलन, आराेपींची धरपकड, न्यायालयीन प्रक्रिया आदी कामकाजाबाबत तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर अपेक्षित बदल झाल्यानंतर या पोलिसांना पुन्हा पोलिस ठाण्यात कामकाजाची संधी मिळणार आहे.

शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त शिंदे यांनी प्रतिबंधात्मक कारवाई वाढवण्यावर भर दिला आहे. तर गुन्हे घडल्यानंतर त्यांची उकल होऊन आरोपींना शिक्षा होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दंगल नियंत्रण पथकात आणलेल्या या सर्व कर्मचाऱ्यांना गुन्हे अन्वेषणासह तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कामगिरी सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना पुन्हा पूर्ववत नियुक्ती देण्याचा निर्णय होणार आहे.

कारवाईचा धसका

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केलेल्या कारवाईचा धसका घेतल्याचे बोलले जात आहे. सर्व पोलिस ठाणे व गुन्हे पथकांच्या प्रभाऱ्यांनी त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्ह्यांची उकल करण्यासोबतच गुन्हेगारांची धरपकड करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button