राज्यभर मुसळधार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाने उडवली दाणादाण | पुढारी

राज्यभर मुसळधार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाने उडवली दाणादाण

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण राज्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचे थैमान सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ते खचले असून, चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीचे पाणी इशारा पातळीवर पोहोचले आहे. परशुराम घाटात रस्त्यावर माती वाहून आल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसामुळे कुडाळ, सावंतवाडीतील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 20 जुलै रोजी रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सातारा, पुणे, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे पूरस्थिती उद्भवल्याने रायगड, सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांना सचेत प्रणालीद्वारे सूचित करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात 40 लाख लोकांना आणि गडचिरोलीतील 15 लाख व इतर जिल्ह्यांच्या प्रवण क्षेत्रातील लोकांना इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड येथील 87, रायगडमधील 991, आणि ठाणे जिल्ह्यातील 458 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

रत्नागिरीत रस्त्यावर माती

रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे चिपळूणमधील परशुराम घाटात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती जमा झाल्याचे चित्र आहे. यामुळे वाहतूक खोळंबली. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कुंभार्ली घाटतही तसेच चित्र दिसत आहे.

सातार्‍यात दरड कोसळली

सातार्‍याच्या अंबेनळी घाटात कुंबळवणे, चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. वेण्णा नदीचे पाणी पाचगणी रस्त्यावर आले आहे.

रायगडमध्ये पावसामुळे वाताहत

रायगड जिल्ह्यात पावसाने लोकांची दैना उडवली असून, महाड शहराला पाण्याने वेढा दिला आहे. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे. दुसरीकडे, पालघरमध्येही पावसाचा जोर दिसून येत आहे.

फडणवीस यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवर संवाद साधला आणि त्यांच्याकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.

चंद्रपुरात पावसाचा उच्चांक

चंद्रपूर शहरात मंगळवारी तब्बल 260 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 4 जुलै 2006 मध्ये 230 मि.मी. पाऊस झाला होता. हवामान खात्याने चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट दिल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुण्यातही संततधार

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत बुधवारी सकाळपासूनच संततधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. सततच्या पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहिले. तर शहराच्या अनेक भागांत पावसामुळे वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या असल्याचे दिसून आले.

Back to top button