रुईछत्तीशी : आरोग्य केंद्र बनले तक्रार केंद्र; रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची गैरसोय

रुईछत्तीशी : आरोग्य केंद्र बनले तक्रार केंद्र; रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची गैरसोय

रुईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर-सोलापूर रस्त्यावर सध्या छोटे-मोठे अपघात घडत आहेत. अपघातानंतर रुग्णांना नगरला तत्काळ पोहोचण्यासाठी आरोग्य विभागाने रुग्णवाहिकेची सोय केली आहे. रुईछत्तीशी येथे 10 गावांसाठी मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, ते तक्रारींचे केंद्र बनले असल्याची चित्र आहे.

रुईछत्तीशी आरोग्य केंद्रात रुग्णांची सोय व्हावी, म्हणून विशेष रुग्णवाहिका देण्यात आली. पण अनेक वेळा ही रुग्णवाहिका दवाखान्यात आढळून येत नसल्याने रस्त्यावर अपघात झालेल्या, तसेच इतर रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. यापूर्वी दोन वेळेस असा प्रकार झाल्याने आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. इतरवेळी देखील रस्त्यावर अपघात झाल्यानंतर या आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका लवकर उपलब्ध होत नसल्याने नगरवरून रुग्णवाहिका बोलवावी लागते. तोपर्यंत खूप वेळ जाऊन रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे रुईछत्तीशी आरोग्य केंद्र तक्रारींचे केंद्रस्थान बनले आहे.

स्थानिक रुग्ण दवाखान्यात गेल्यानंतर अनेक आजारांवरील औषधे मिळत नसल्याने रुग्णांची गैरसोय वाढली आहे. खासगी दवाखान्यात जास्त खर्च येत असल्याने सामान्य नागरिक सरकारी दवाखान्यात जाणे पसंद करतात. पण सर्वच गोष्टींची पूर्तता होत नसल्याने आरोग्य केंद्राचा कारभार पारदर्शी नाही, असे लक्षात आले आहे.

तालुका आरोग्य प्रशासनाने यात लक्ष घालून अडचणी सोडवण्याची गरज आहे. पूर्णवेळ रुग्णवाहिका, सर्व आजारांवरील औषधे, विशेष रुग्ण कक्ष या गोष्टींची पूर्तता होणे गरजेचे आहे. दहा गावांचे आरोग्य केंद्रबिंदू असणारे रुईछत्तीशी प्राथमिक आरोग्य केंद्र अलीकडे सुविधांच्या गैरसोयीमुळे चर्चेत आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राने गावात होणार्‍या संसर्गजन्य आजाराविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. त्याबाबत देखील कोणतीही कार्यवाही आरोग्य केंद्राकडून होत नसल्याने आरोग्य विभागाने हे सर्व प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका पूर्णवेळ देण्याचा प्रयत्न राहील. सर्व आजारांवरील औषधे मिळण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनकडे मागणी करणार आहे. रुग्णांना पूर्णवेळ सेवा देण्याचा प्रयत्न राहील.

– अंजुश्री भोसले,
वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, रुईछत्तीशी.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news