मंचर : निरगुडसर-पारगाव रस्त्यावर चारचाकी वाहनांची घसरगुंडी सुरूच | पुढारी

मंचर : निरगुडसर-पारगाव रस्त्यावर चारचाकी वाहनांची घसरगुंडी सुरूच

मंचर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : पारगाव (ता.आंबेगाव) ते निरगुडसर रस्त्यावरील पठारवस्ती येथे रस्त्याचे काम सुरू आहे. पावसामुळे येथे चिखलाची दलदल झाली असून, दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनेही घसरू लागली आहेत. मोठी दुर्घटना होण्याअगोदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालक करत आहेत. पारगाव ते निरगुडसर रस्त्यावरील पठारवस्ती येथील पाण्याच्या टाकीजवळ सुमारे अर्धा किलोमीटरच्या रस्त्याला तीव्र उतार व चढ असल्याने रस्ता खोदून चढ कमी करण्याचे काम चालू आहे. महिन्यापूर्वी या कामाला सुरुवात झाली असून, आता पावसाळा सुरू झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाळ साचत असल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक मोटारसायकली घसरून पडल्याने किरकोळ अपघात झाले आहेत.

बुधवारी (दि.28) रात्री दूध वाहतूक करणारा छोटा हत्ती, एक स्विफ्ट डिझायर रस्त्यावरून घसरून रस्त्याकडेला शेतात गेल्या होत्या. गुरुवारी (दि.29) दुपारी पारगाव पोलिस ठाण्याची गाडी रस्त्यावरून घसरून रस्त्याखाली खड्डयात गेली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने रस्ता गुळगुळीत झाला आहे. त्यामुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटत आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर दुर्घटना होण्याची वाट न पाहता तत्काळ रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.

निरगुडसर पारगाव रस्त्यावर चिखल साचल्याने रस्ता गुळगुळीत झाला आहे. त्यामुळे वाहने घसरण्याचे प्रकार घडले आहेत. पारगाव पोलिस ठाण्याची गाडीही घसरण्याचा प्रकार घडला आहे. त्यावेळी मी गाडीत नव्हतो. मात्र, आमचे कर्मचारी गाडीत होते. ते सुखरूप आहेत. रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित ठेकेदाराने युद्धपातळीवर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशा सूचना दिल्या आहेत.
                         लहू थाटे, सहायक पोलिस निरीक्षक, पारगाव पोलिस ठाणे.

 

Back to top button