वाळकी : कृषी अधिकार्‍यांची चाड्यावर मूठ; खरिपाच्या पेरणीला सुरुवात | पुढारी

वाळकी : कृषी अधिकार्‍यांची चाड्यावर मूठ; खरिपाच्या पेरणीला सुरुवात

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. पिंपळगाव लांडगा परिसरात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी पथकासह या परिसरात पाहणी करताना, त्यांना चाड्यावर मुठ धरण्याचा मोह आवरला नाही.

एका शेतात नवले यांनी सोयाबीन पेरणीचा प्रारंभ केला. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने दगा दिला अन् मान्सूनचा पाऊसही लांबल्याने खरीप हंगाम धोक्यात आल्याने बळीराजा हतबल झाला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी तालुक्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. तालुक्यातील काही मंडलात कमी, तर काही मंडला पेरणी योग्य पाऊस झाला.

पिंपळगाव लांडगा, भातोडी, मेहकरी, तसेच परिसरातील आठ गावामत पावसाचा दमदार प्रारंभ झाल्याने खरीप पिकांच्या पेरणीच्या कामाला शेतकरी लागला आहे. परिसरात सोयाबीन अन् मुगाच्या पेरणीची लगबग वाढली आहे. खरीप पेरण्यांनी आता वेग घेतला आहे.
पिंपळगाव लांडगा परिसरात उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले, मंडन कृषी अधकारी वराळे, कृषी पर्यवेक्षक गावखरे, कृषी सहायक शुभम काळे, शेखर काळे व नांगरे यांनी पेरणीयोग्य पाऊस आहे की नाही याची पाहणी केली. पावसाने शेतात खोलवर ओल गेल्याने पेरणीची कामे करण्यास सांगितले. यावेळी मारुती लांडगे यांच्या शेतात सोयाबीन पेरणीची लगबग सुरू होती. यावेळी कृषी अधिकारी नवले यांनी सोयाबीन पेरणीसाठी चाड्यावर मूठ धरली.

नव्वद मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणीची कामे करणे योग्य आहे. मात्र, जमिनीतील ओल खोलवर असेल, तर शेतकर्‍यांनी पेरणी करावी. सध्या मुगाची पेरणी केली तरी काही अडचण येणार नाही. पिंपळगाव लांडगा परिसरात सोयाबीन पेरणीला शेतकर्‍यांनी प्राधान्य दिले आहे, असे उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी सांगितले.

हेही वाचा

मंचर : निरगुडसर-पारगाव रस्त्यावर चारचाकी वाहनांची घसरगुंडी सुरूच

अहमदनगर : विदेशी मद्यासह तिघांना पकडले; भिंगार पोलिसांची कारवाई

रूईछत्तीशी : वनराईकडे पर्यटकांनी फिरविली पाठ

Back to top button