जुनी नगर वाट रस्ता दुरुस्ती करा; जेऊरमधील विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल | पुढारी

जुनी नगर वाट रस्ता दुरुस्ती करा; जेऊरमधील विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जेऊर येथील जुनी नगर वाट रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी माजी सैनिक राजू बनकर यांच्यासह प्रवाशांनी केली आहे. जुनी नगर वाट हा रस्ता वर्दळीचा रस्ता आहे. धनगरवाडी तसेच तवले वस्ती, नाईक मळा येथील नागरिक व विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना जेऊर येथील शाळेत जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. सद्यस्थितीत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात असल्यानंतर खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे विद्यार्थी पडून जखमी होण्याची शक्यता आहे. या परिसरात मोठी लोकवस्ती असून, दूध व्यावसायिकांचे, नागरिकांचे रस्त्याअभावी अतोनात हाल होत आहेत. सदर रस्ता दुरुस्त करणे गरजेचे आहे.

सीना नदीवरील संतुकनाथ विद्यालया शेजारचा पूल मागील वर्षी जून महिन्यात पुरामध्ये वाहून गेला होता. अद्यापि पुलाचे काम करण्यात आले नाही. हा पूल देखील विद्यार्थी, नाईक मळा व परिसरातील नागरिकांसाठी ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा आहे. वर्ष उलटून देखील पुलाचे काम मार्गी लागत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जुनी नगर वाटर रस्ता तसेच संतुकनाथ विद्यालया शेजारील सीना नदीवरच्या पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी राजू बनकर यांच्यासह नाईक मळा तसेच परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा

अहमदनगर : विदेशी मद्यासह तिघांना पकडले; भिंगार पोलिसांची कारवाई

पुणे : आंबेगाव पूर्वेला पावसाला सुरुवात

म्हैसगाव सोसायटीच्या अध्यक्षांसह संचालक अपात्र

Back to top button