आषाढी एकादशीला कुर्बानी नाही ! नेवाशात मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय | पुढारी

आषाढी एकादशीला कुर्बानी नाही ! नेवाशात मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर करीत नेवासा शहरातील मुस्लिम बांधवांनी यंदा बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी, त्या दिवशी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे नेवासा शहरासह वारकरी संप्रदायातून स्वागत होत आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव बकर्‍याची कुर्बानी देतात, तर आषाढी एकादशीला वारकर्‍यांचा उपवास असतो. त्यामुळे हिंदू बांधवांच्या भावनांचा अवमान होऊ नये व 29 रोजी आषाढी एकदाशी तसेच याच दिवशी मुस्लिम बांधवाचा पवित्र सण बकरी ईदही आहे.
नेवासा पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.24) सायंकाळी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मुस्लिम समाजाच्या शहरातील सर्वच प्रमुख नेत्यांनी ही घोषणा केली.

यावेळी पोलिस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे म्हणाले, नेवासा शहरात मागील काळात काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. अशा प्रकारांमध्ये विविध समाजातील फक्त दोन टक्के लोक असतात. ते कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करतात. या लोकांना आपणच जागेवर आणू शकतो. आषाढी एकादशी व पवित्र बकरी ईद एकाच दिवशी आहेत. सण-उत्सव एकमेकांच्या हातात हात घालून येतात. मग, आपण देखील अशाच प्रकारे हातात हात घालून एकत्रितपणे सर्व सण-उत्सव साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी जातीय सलोखा समितीचे आसिफ पठाण, बहुजन चळवळीचे नेते संजय सुखदान, इम्रान दारूवाला, राजेंद्र मापारी, रहेमान पिंजारी, अब्बास बागवान, साईनाथ लष्करे, अ‍ॅड, जावेद इनामदार, सुलेमान मणियार, मौलाना तन्वीर, प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड, रमेश शिंदे, पवन गरुड, कैलास लष्करे यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य व शहरातील सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कायदा सुव्यवस्था अबाधित राखा

सण, उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. चांगल्या कार्यात बाधा आणणार्‍यांची गय केली जाणार नाही. त्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क असल्याचा इशारा पोलिस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी यावेळी दिला. यावेळी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

पुण्यात फळभाज्यांची टंचाईच ! उत्पादन घटल्याने बाजारात फक्त 90 ट्रक शेतमाल दाखल

कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीसाठी दिला उपोषणाचा इशारा

नाशिक : पदोन्नती प्रक्रिया रखडल्याने चतुर्थ श्रेणी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

Back to top button