पुण्यात फळभाज्यांची टंचाईच ! उत्पादन घटल्याने बाजारात फक्त 90 ट्रक शेतमाल दाखल | पुढारी

पुण्यात फळभाज्यांची टंचाईच ! उत्पादन घटल्याने बाजारात फक्त 90 ट्रक शेतमाल दाखल

शंकर कवडे : 

पुणे : पाण्याच्या तुटवड्यामुळे उत्पादनात घट झाल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात सर्व प्रकारच्या फळभाज्यांची टंचाई आहे. रविवारी (दि. 25) बाजारात 90 ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. एरव्ही मार्केट यार्डात 120 ट्रक शेतमाल दाखल होत असतो. बाजारात झालेल्या आवकच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने टोमॅटो, दोडका, कारली, पापडी, वालवर, कोबी, हिरवी मिरचीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. तर मागणीअभावी गवार, भेंडीच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली.

उर्वरित सर्व फळभाज्यांची आवक जावक कायम राहिल्याने बहुतांश फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले आहेत. राज्यभरात मान्सूनने हजेरी लावल्याने पेरणीचा कामाला वेग येईल. मान्सून आला असला तरी आवकेत तत्काळ वाढ होणार नाही. फळभाज्यांची घटलेली आवक आणखी महिनाभर कायम राहील, अशी शक्यता ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी वर्तविली.

परराज्यांतील आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात येथून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटक येथून 2 ते 3 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, इंदौर येथुन गाजर 6 ते 7 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार 5 ते 6 ट्रक मटार, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी 1 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 8 ते 10 टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 800 ते 900 गोणी, गवार व भेंडी प्रत्येकी 6 ते 7 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो सुमारे 6 ते 7 हजार क्रेट्स, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, भुईमूग शेंग 150 ते 160 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा 70 ते 75 ट्रक, इंदौर व आग्रा भागातून बटाटा 40 ते 45 टेम्पोमधून बाजारात दाखल झाला.

पालेभाज्यांच्या दरात घसरण
पावसास सुरवात झाल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची तोड करून बाजारात विक्रीसाठी पाठविली. परिणामी, किरकोळ बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दरात घसरण झाली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची 1 लाख जुडींची आवक झाली, तर मेथीची 40 हजार जुडी इतकी आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक 50 हजार जुडींनी तर मेथीची आवक दहा हजार जुड्यांनी घटली.

हे ही वाचा : 

पुणे : उरुळी देवाची येथील गोदाम खाक

पुणे : पाच महिन्यांत 7 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Back to top button