कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीसाठी दिला उपोषणाचा इशारा | पुढारी

कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीसाठी दिला उपोषणाचा इशारा

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीला अंतिम मंजुरी देण्यासाठी राज्य सरकार वारंवार पाठपुरावा करूनही टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील युवक व नागरिकांनी थेट मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांना पत्र देत उपोषणाचा इशारा दिला आहे. मतदारसंघात उद्योगाची चाके फिरावीत, येथील युवकांना रोजगार मिळावा, तसेच मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती व्हावी, या प्रमुख उद्देशाने आमदार रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यानुसार पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन होण्याच्या दृष्टीने औद्योगिक विकास विभागामार्फत भू-निवड समितीची स्थळ पाहणी व ड्रोन सर्वेक्षण झाले.

उच्चाधिकार समितीच्या बैठकीची मान्यता देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळाली. एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी आमदार पवार यांनी विधिमंडळात वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित केला. तसेच उद्योग मंत्र्यांची भेट घेऊन अधिसूचना जाहीर करण्याबाबत पाठपुरावाही केला. त्यावर मंत्र्यांनी आश्वासन देऊनही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्या भेटीमध्ये आमदार पवार यांनी दोघांकडेही औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे 2023 रोजी जाहीर करून इतर कायदेशीर बाबी या राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त 26 जून 2023 पर्यंत पूर्ण कराव्यात, अशी विनंती केली होती. राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत याबाबत ठोस निर्णय न झाल्यास 26 जूनपासून नागरिक, युवा वर्गासह हजारोंच्या संख्येने उपोषणाला बसणार असल्याचे आमदार पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आता मतदारसंघातील नागरिक व युवकांनी थेट मंत्रालय गाठून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीपर्यंत एमआयडीसीला अंतिम मंजुरी न मिळाल्यास उपोषणावर ठाम असल्याचे दाखवून दिले आहे.

मंत्रालयातील अधिकार्‍यांना पत्र

कर्जत व जामखेड तालुक्यातील नागरिक व युवकांनी मंत्रालयात उद्योग व खनिकर्म प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे व मंत्रालय मुख्य सुरक्षा अधिकारी पोलिस उपायुक्त प्रशांत परदेशी यांची भेट घेऊन त्यांना उपोषणाचे पत्र दिले आहे.

हेही वाचा

पंढरपूर : कॉरिडॉरच्या कामांची प्रतीक्षा कायम

अजित पवारांच्या मागणीचा निर्णय पक्षातील प्रमुख लोक घेतील : शरद पवार

वडगाव शेरी परिसरात पाण्याचा काळाबाजार !

Back to top button