वडगाव शेरी परिसरात पाण्याचा काळाबाजार ! | पुढारी

वडगाव शेरी परिसरात पाण्याचा काळाबाजार !

येरवडा (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा:  महापालिकेकडे पाण्याचे चलन 900 रुपयांचे काढायचे अन् 10 हजार लिटरचा टँकर भरून तो नागरिकांना 4 ते 5 हजार रुपयांना विकण्याचा धंदा वडगाव शेरी परिसरातील टँकर माफियांकडून सुरू आहे. टँकर केंद्रावर ठेकेदारांचाही यात सहभाग आहे. एकीकडे महापालिका पाणीकपात करत असताना टँकर माफियांसाठी मात्र खुलेआम टँकर केंद्र सुरू आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकाराला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
 महापालिकेकडील पाण्यासाठी 900 रुपयांचे चलन काढल्यानंतर दहा हजार लिटर पाणी मिळते. चलन काढल्यानंतर स्वारगेट केंद्रावरून पाणी भरून दिले जात होते. मात्र, टँकर लॉबीच्या फायद्यासाठी वडगाव शेरी येथील केंद्रावरून टँकर भरून दिले जात आहेत, त्यामुळे  निविदांच्या टँकरपेक्षा अगोदर प्राधान्य चलन काढलेल्या टँकरला मिळत आहे. कर्मचारी अधूनमधून विनाचलन देखील टँकर भरून पाठवत असतात. त्याचे पैसे मात्र कर्मचारी टँकर चालकांकडून स्वतःकडे ठेवत असतात. चलनाद्वारे भरलेल्या टँकरचे पाणी हॉटेल, कॉलेज, खासगी ठिकाणे, सोसायट्या, बांधकाम साईट आदींना पुरवून समोरच्याकडून 4 ते 5 हजार रुपये घेतले जात आहेत.
दररोज चलनाद्वारे 50 ते 60 टँकर वडगाव शेरी टँकर केंद्रावर भरले जातात. तर पाणीटंचाई  असलेल्या ठिकाणी निविदाचे सुमारे 80 टँकर दररोज भरले जात आहेत. एकंदरीतच वडगाव शेरी टँकर केंद्रावर पाण्याचा काळाबाजार तेजीत सुरू आहे. परिसरातील नागरिक मात्र पाणीटंचाईमुळे त्रस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.
टँकरने पाणीपुरवठा करणार्‍या ठेकेदारांना 662 रुपयांचे चलन भरल्यानंतर त्यांच्या टँकरमध्ये 10 हजार लिटर पाणी भरून दिले जाते. तर नागरिकांनी 882 रुपयांचे चलन भरल्यानंतर त्यांना महापालिकेच्या टँकरमधून पाणीपुरवठा केला जातो. याद्वारे रोज सुमारे 70 चलनाचे पास जमा होत आहेत. निविदा आणि चलनाच्या पासचे सुमारे 130 टँकर केंद्रावरून भरले जात आहेत. निविदा भरलेल्या ठेकेदारांच्या खेपा कमी होत असल्याने चलनाच्या टँकर स्वारगेट केंद्रावरून भरण्याचा विचार आहे.
                                                      – नितीन जाधव, अधिकारी, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Back to top button