पंढरपूर : कॉरिडॉरच्या कामांची प्रतीक्षा कायम | पुढारी

पंढरपूर : कॉरिडॉरच्या कामांची प्रतीक्षा कायम

पंढरपूर; सुरेश गायकवाड :  तीर्थक्षेत्र पंढरीत भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता वाराणशीच्या धर्तीवर येथे कॉरिडॉर राबवून विकास साधण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे. पंढरपूर कॉरिडॉरची कामे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्यक्षात मात्र पंढरीत भाविकांना पार्किंग, चंद्रभागा नदी पाणी प्रदूषण, टॅक्स पावती, दर्शन रांगेतील दिरंगाई आदी गोष्टींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पंढरीत रस्त्यांबरोबर घाट सुशोभीकरण, दर्शन रांगेसाठी अद्ययावत व्यवस्था, मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्गावर रुंदीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.

स्थानिकांवर अन्याय नाही

नव्या योजनेनुसार पंढरीत अनेक रस्त्यांचे रुंंदीकरण होणार असून, यापैकी 11 रस्ते मंदिराभोवतालचे आहेत. अन्य आठ रस्ते चंद्रभागा नदीकडे जाणारे तर 13 रस्ते हे शहरालगतचे बाह्यवळणमार्ग असणार आहेत. यामध्ये अनेकांची घरे, दुकाने पाडली जाणार असल्याने त्या परिसरातील रहिवासी, व्यापार्‍यांनी आक्रमक होत आंदोलन केले होतेे. मात्र, कॉरिडॉरची अंमलबजावणी करताना स्थानिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

दर्शनमंडप न पाडण्याचा मतप्रवाह

सध्या अस्तित्वात असलेली सात मजली संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपची इमारत पाडण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, भाविकांनी मंदिर समितीस देणग्या देऊन दर्शन मंडपाची इमारत उभारली असल्याने यामध्ये भाविकांच्या भावना गुंतलेल्या आहेत. त्यामुळे हा दर्शन मंडप न पाडता याचा वापर करण्यात यावा, असाही मतप्रवाह पुढे येत आहे.

स्थानिकांसह महाराजांना विश्वासात घ्यावे

पंढरपूरचा विकास आराखडा राबवताना स्थानिकांना विश्वासात घेऊन महाराज मंडळी, भाविकांची मते जाणून घेऊनच अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. कारण पंढरपूरचे अर्थकारण हे वर्षभरातील चार यात्रा व मंदिरावरच अवंबून आहे. मंदिर परिसरात प्रासादिक साहित्याची दुकाने, हॉटेल, आस्थापनाधारक, रिक्षा, टांगावाले अशा शेकडो कुटूंंबाची उपजीविका मंदिर, वारी, भाविक यावरच अवंबून आहे.

स्काय वॉकसह हवा विकास

पंढरपूरचा विकास आराखडा राबवताना पेयजल योजना, मलनिःस्सारण केंद्र, बंदिस्त गटार योजना, स्काय वॉक, अद्ययावत दर्शन रांग, वाहनतळे, भाविकांसाठी निवास व्यवस्था, 65 एकर परिसराचा विकास, आरोग्य सेवा, उद्यानांचा विकास, चंद्रभागेत कायमस्वरुपी पाणी राहण्याची व्यवस्था, चंद्रभागा प्रदूषण रोखणे, शहरास पुरेसा व योग्य दाबाने वीज पुरवठा, अतिक्रमणमुक्त शहर या सर्व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे.

भाविक केेंद्रबिंदू मानून कामे व्हावीत

कॉरिडॉरमध्ये होणारी कामे ही दर्जेदार असावीत. संत तुकाराम जन्म चतुःशताब्दी योजनेतून सुरू असलेले घाटजोडणीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ते काम पूर्ण होण्याअगोदरच ढासळले. अशी अवस्था कॉरिडॉरमधील कामांची होऊ नये, अशी अपेक्षा आहे. बांधकाम क्षेत्रातील नामांकित संस्थांकडूनच कामे करून घेण्याची मागणी आहे. भाविक हा केंद्रबिंदू मानून पंढरपूर कॉरिडॉरमधील सर्व कामे दर्जेदार व्हावीत, अशी भाविकांची अपेक्षा आहे.

Back to top button