अहमदनगर : अन् वाचले वारकर्‍याचे प्राण..! ‘वारी आपल्या दारी’ संपर्क सूचीमुळे वेळेत आरोग्यसेवा | पुढारी

अहमदनगर : अन् वाचले वारकर्‍याचे प्राण..! ‘वारी आपल्या दारी’ संपर्क सूचीमुळे वेळेत आरोग्यसेवा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी रवाना झाले आहेत. नगर जिल्ह्यातील एका वारकर्‍याला वाटेतच हृदयविकाराचा झटका आला. मात्र, जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘वारी आपल्या दारी’ या संपर्क सूचीमुळे, तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे वारकर्‍यांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी यंदा दोन लाख वारकरी पायी पंढरपूरकडे जाणार असल्यामुळे या वारकर्‍यांना दिंडी मार्गावरच मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यामुळे प्रशासनाने वारकर्‍यांची जागोजागी चोख व्यवस्था केली.

शनिवारी (दि.24) नगर जिल्ह्यातील भातोडी या गावचे वारकरी सुभाष काशिनाथ पवार यांना रात्री अडीच वाजता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी या ठिकाणी हृदयविकाराचा झटका आला. पवार यांच्यासोबत असलेले वारकरी शामराव घोलप यांनी ‘वारी आपल्या दारी’ या संपर्क सूचीमधून मोबाईल क्रमांक पाहात थेट जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना मध्यरात्री फोन करून घटनेची माहिती देत मदत मागितली.

जिल्हाधिकारी सालीमठ यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता, सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना पहाटे 2.46 वाजता दूरध्वनीद्वारे संपर्क करून घटनेची माहिती दिली. वारकरी सुभाष पवार यांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्याची सूचना केली. सोलापूर प्रशासनाने तत्परता दाखवित तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देत वारकर्‍याला वैद्यकीय सेवा दिली. तत्परतेने व वेळेत वैद्यकीय सेवा मिळाल्याने सुभाष पवार या वारकर्‍याचे प्राण वाचविण्यात यश आले.

हेही वाचा

शाहू-फुले-आंबेडकर यांचे सामाजिक न्यायाचे विचार अंगीकारण्याची गरज : राज्यमंत्री डॉ. भारती पवार

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात ! महिलेला जावं लागलं घृणास्पद प्रकाराला सामोरं

नालसाब मुल्ला खून प्रकरण : सचिन डोंगरेला 2 जुलैपर्यंत कोठडी

 

Back to top button