नगर: नाट्यमय घडामोडीनंतर अखेर पारनेर नगराध्यक्ष विजय औटी यांचा राजीनामा | पुढारी

नगर: नाट्यमय घडामोडीनंतर अखेर पारनेर नगराध्यक्ष विजय औटी यांचा राजीनामा

पारनेर (नगर): पारनेर नगरपंचायतच्या ठरलेल्या सव्वा वर्षाच्या कार्यकालानंतर नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी व उपनगराध्यक्ष सुरेखा अर्जुन भालेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विजय औटी यांनी प्रथम राजीनामा देण्यास नकार दिला असल्याची चर्चा होती. मात्र, नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राजीनामा  सुपूर्त केला; दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत गटनेतेपदी योगेश मते यांची निवड करण्यात आली.

पारनेर नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. बाजार समिती निवडणुकीनंतर शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यात आले होते. आमदार निलेश लंके यांच्या सूचनेनुसार सव्वा वर्षासाठीचा पदाचा कार्यकाल ठरवला होता. त्यानुसार 23 जून रोजी सकाळी सुरेखा भालेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नगराध्यक्ष विजय औटी हे प्रथम राजीनामासाठी तयार नसल्याची चर्चा होती. मात्र, संध्याकाळी 4 च्या सुमारास त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगरपालिका विभागाचे सह आयुक्त प्रशांत खांडगेकर यांच्याकडे दिला. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीच्या गटनेते पदासाठी बैठक पार पडली. आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनानुसार नगरपंचायतचे पाणीपुरवठा सभापती योगेश मते यांच्या नावावर गटनेते म्हणून शिक्कामार्फत झाले. गटनेते पदाचे पत्र सहआयुक्त प्रशांत खांडगेकर यांच्याकडे देण्यात आले. जिल्हाधिकारी निवडणूक प्रशिक्षणाच्या कामकाजामुळे उपलब्ध नसल्याने नगरपालिका विभागाचे सहआयुक्त खांडगेकर यांनी राजीनामा व गटनेते पदाचा अर्ज स्वीकारला असून त्यावर जिल्हाधिकारी निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान नगराध्यक्ष विजय औटी यांनी पारनेर नगरपंचायतच्या सभागृहात शुक्रवारी विशेष मासिक सभेचे आयोजन करण्यात केले होते. या बैठकीमध्ये वैयक्तिक कामासह इतर विकास कामावरही चर्चा घेण्यात येणार होती. परंतु, नगराध्यक्षपद राजीनामा नाट्य रंगल्याने याचे पडसाद बैठकीवर उमटले. सत्ताधारी व काही विरोधी नगरसेवकांनी या बैठकीवर बहिष्कार घातलेचे दिसून आले. या बैठकीकडे कोणताही नगरसेवक फिकला नसल्याने विजय औटी यांचे धक्का तंत्र शमले व राजीनामा देण्यासाठी त्यांनी तडक जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. राष्ट्रवादीच्या गटातील नगरसेवक प्रियंका सचिन औटी, विजय सदाशिव औटी, विद्या बाळासाहेब कावरे, सुरेखा अर्जुन भालेकर, हिमानी रामजी नगरे, भूषण उत्तम शेलार, नीता विजय औटी, नितीन रमेश अडसूळ, सुप्रिया सुभाष शिंदे अशोक फुलाजी चेडे, योगेश अशोक मते अशा अकरा जणांची गट नोंदणी करण्यात आली आहे.

पारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची गट नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये अपक्षांसह भाजपचे नगरसेवक अशोक चेडे यांनी सहयोगी सदस्य म्हणून आपल्या नावाचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यानुसार 11 सदस्यांची गट नोंदणी करण्यात आली असून गट नेतेपदी पाणीपुरवठा सभापती योगेश मते यांची निवड करण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले.

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदांसंदर्भात निवडणूक प्रक्रिया होणार असून राष्ट्रवादीकडून नितीन अडसूळ, योगेश मते तर उपनगराध्यक्ष पदासाठी डॉ. विद्या बाळासाहेब कावरे, भूषण शेलार, अशोक चेडे आदी स्पर्धेत आहेत.

राजकारणात शब्दाला किंमत असते. आमदार निलेश लंके यांच्या आदेशानुसार व बाकी नगरसेवकांना भविष्यात संधी  मिळण्यासाठी मी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.

सुरेखा अर्जुन भालेकर, उपनगराध्यक्ष पारनेर

माझा सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. इतर सदस्यांना संधी मिळावी म्हणून आमदार निलेश लंके यांना दिलेल्या शब्दांनुसार मी आपला राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्त केला आहे.

विजय सदाशिव औटी,  नगराध्यक्ष पारनेर

हेही वाचा:

Rahul Gandhi And Lalu Prasad Yadav : राहुल गांधींच्या लग्नाची विरोधकांना काळजी! वऱ्हाडी म्हणून मिरवायला लालूंना झाली घाई

सांगली : जत येथील सराफ दुकानातून भरदिवसा सव्वा लाख किमतीचे दागिने लंपास : दोन अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : दत्तवाड ग्रामपंचायतने चक्क नदीत मारले बोर; पाण्याची गरज भागवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न

 

Back to top button