कोल्हापूर : दत्तवाड ग्रामपंचायतने चक्क नदीत मारले बोर; पाण्याची गरज भागवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न | पुढारी

कोल्हापूर : दत्तवाड ग्रामपंचायतने चक्क नदीत मारले बोर; पाण्याची गरज भागवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा: दत्तवाड तालुका शिरोळ येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊन दुष्काळ जन परिस्थिती झाली आहे. गेले पंधरा दिवस होऊन अधिक कालावधी झाले दूधगंगा नदीपात्र कोरडे पडले आहे. पावसाचाही पत्ता नाही. त्यामुळे पाण्याची गरज भागवण्यासाठी एक मात्र स्रोत विहिरी व बोर हेच शिल्लक राहिले आहे. त्यातही उन्हाच्या तडाख्यामुळे भूजल पातळी घटली असून अनेक बोरवेल आटू लागले आहेत. तर विहिरीनेही तळ गाठले आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. यामुळे ग्रामपंचायतने पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी चक्क नदीपात्रात बोर मारले आहे. परंतु, संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होत नसल्याचे चित्र दिसत आहे.

शिरोळ येथील शेतीची अवस्था ही याहून बिकट झाली आहे. शेतातील उभी पिके वाळू लागली आहेत. नागरिकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी अनेक ग्रामपंचायत सदस्य प्रभागात टँकरने पाणीपुरवठा करत आहेत. दरम्यान दत्तवाड ग्रामपंचायतने या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी चक्क नदीपात्रात बोर मारले. यातही निसर्गाने पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. कारण संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी किमान चार इंचावर पाणी लागणे अपेक्षित होते. मात्र, अडीच ते तीन इंच पाणी लागले आहे. त्यामुळे ते पाणी कितपत चालेल याचीही शाश्वती नाही. याशिवाय ठिकठिकाणी नवीन बोर मारून पाण्याची काही सोय होते का हेही पाहिले जात आहे.

येथील ग्रामीण रुग्णालय व विविध शाळांमध्येही पाणीपुरवठा करणारे बोर आटले आहेत. त्यामुळे रुग्ण व विद्यार्थ्यांची फारच गैरसोय होत आहे. येथेही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. आता निसर्गानेच दया दाखवून पाऊस पडावा तरच पाण्याची ही गरज भागवली जाऊ शकते. अशी भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. जर येणाऱ्या आणखी काही दिवसात पावसाला सुरुवात नाही झाली तर या परिसराची अवस्था मराठवाड्याहून बिकट होणार आहे. मोठ्या कष्टाने वाढवलेली पिके पूर्णपणे हातून जाणार असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पाण्यासाठी माणुसकीचे दर्शन

सध्या गावात काही मोजक्याच बोरवेल ना पाणी आहे. त्यामुळे जात, भेद, उच्च – नीच हा सर्व भेदभाव बाजूला ठेवून बोरला पाणी असणारे नागरिक इतर पाणी मागण्यासाठी आलेल्या सर्वच नागरिकांना पाणी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button