संगमनेर मोर्चात चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या तिघांविरोधात अखेर गुन्हा दाखल | पुढारी

संगमनेर मोर्चात चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या तिघांविरोधात अखेर गुन्हा दाखल

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: संगमनेरला निघालेल्या भगव्या मोर्चामध्ये चिथावणीखोर भाषणबाजी केल्याचा ठपका ठेवत दिल्ली येथील जेष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके यांच्यासह स्थानिक बजरंग दलाच्या दोघा पदाधिकाऱ्यांवर जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी तब्बल दहा ते पंधरा दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ६ जून रोजी शहरात निघालेल्या मोर्चाला परवानगी देताना आयोजकांना शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून परवानगी दिली होती. त्यासोबतच चिथावणीखोर भाषणांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची आठवणही करुन देण्यात आली होती. मात्र, आयोजकांनी या गोष्टीचे उल्लंघन केले असून समारोपाच्या वेळी सुरेश चव्हाणके यांनी अतिशय द्वेषपूर्ण व चिथावणी देणारे भाषण केल्याने समनापूरातील प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवून सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके (रा. नोएडा), बजरंग दलाचे संयोजक विशाल वाकचौरे व योगेश सूर्यवंशी या तिघांवर जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी भारतीय दंडसंहितेच्या कलम 153 (अ) सह 505 (2), 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने संगमनेर तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:

Stock Market Closing | सेन्सेक्स ६३ हजारांखाली, मिड, स्मॉलकॅप्स घसरले, जाणून घ्या आजचे ट्रेडिंग

Team India Announcement : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर!

Titanic Submarine | टायटॅनिक पाहायला गेलेल्या पाणबुडीचे झाले तुकडे, खोल समुद्रात नेमकं काय घडलं?

 

Back to top button