Titanic Submarine | टायटॅनिक पाहायला गेलेल्या पाणबुडीचे झाले तुकडे, खोल समुद्रात नेमकं काय घडलं? | पुढारी

Titanic Submarine | टायटॅनिक पाहायला गेलेल्या पाणबुडीचे झाले तुकडे, खोल समुद्रात नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : अटलांटिक समुद्रात १९१२ मध्ये बुडालेल्या टायटॅनिक (Titanic) जहाजाचे अवशेष पाहाण्यासाठी गेलेली टायटन (Titan) पाणबुडी बेपत्ता झाली होती. पण ही पाणबुडी सापडली असून यातील अब्जाधीशांसह ५ जणांचा मृत्यू झाला. यूएस कोस्ट गार्ड आणि जहाजाची मालकी असलेल्या कंपनीच्या म्हणण्यानुसार, टायटॅनिकच्या प्रवासादरम्यान हरवलेल्या सबमर्सिबलमधील पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. १८ जून रोजी या पाणबुडीचा संपर्क तुटला होता. त्यानंतर टायटन पाणबुडीचा शोध १० हजार चौरस मैल समुद्राच्या पाण्यात घेण्यात आला. (Titanic Submarine)

यूएस कोस्ट गार्डचे रिअर अॅडमिरल जॉन मॅगर यांनी पुष्टी केली की टायटनचे काही भाग टायटॅनिकच्या ढिगाऱ्यापासून सुमारे १,६०० फूट अंतरावर सापडले आहेत. ही पाणबुडी विनाशकारी स्फोटाची (catastrophic implosion) शिकार बनली. यातील पाच जणांचे मृतदेह परत मिळू शकतील की नाही याची खात्री देऊ शकत नसल्याचे मॅगर यांनी म्हटले आहे.

पाणबुडी जहाजावरील पाच लोकांमध्ये ब्रिटिश अब्जाधीश आणि एक्सप्लोरर हमिश हार्डिंग (वय ५८), पाकिस्तानी वंशाचे उद्योगपती शाहजादा दाऊद (वय ४८), आणि त्याचा १९ वर्षांचा मुलगा सुलेमान (दोघेही ब्रिटिश नागरिक), फ्रान्सचे एक्सप्लोरर (शोधक) आणि टायटॅनिक तज्ज्ञ पॉल-हेन्री नार्गोलेट (वय ७७) आणि ओशनगेटचे मुख्य कार्यकारी स्टॉकटन रॅश यांचा समावेश आहे. रॅश हे सबमर्सिबलचे पायलटिंग करत होते. (Titanic Submarine)

महासागरांचा शोध घेण्याची त्यांची होती उत्कट इच्छा

“ही माणसे साहसाची वेगळी जाणीव असलेले खरी शोधक होती आणि जगाच्या महासागरांचा शोध आणि संरक्षण करण्याची त्यांची उत्कट इच्छा होती,” असे OceanGate Expeditions ने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. “या दु:खद काळात या पाच आत्म्यांसोबत आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत आमच्या संवेदना आहेत.” असेही त्यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.

टायटनच्या जहाजाशी झालेल्या शेवटच्या संपर्क वेळेवरून असे सूचित होते की रविवारीच पाणबुडीचा स्फोट झाला असावा. पाणबुडीचा प्रवास दोन तासांचा होता. पण पावणे दोन तासांच्या डुबकीनंतर त्यांचा जहाजाशी संपर्क तुटला आणि त्यानंतर ही दुर्घटना कधी झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मॅसेच्युएटस येथील केप कोडच्या पूर्वेला ९०० मैल अंतरावर या पाणबुडीचा शेवटचा संपर्क झाला होता.

पाणबुडीचे मिळाले दोन ढिगारे

आधी पाणबुडीला आतून काहीतरी धडकल्याचा आवाज येत असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र नंतर हा आवाज तिथे असलेल्या इतर जहाजांमधून येत असल्याचे आढळून आले. शोधमोहिमेतील लोकांनी सांगितले की टायटन पाणबुडीचे दोन ढिगारे मिळाले असून यावरुन ही पानबुडी भीषण स्फोटाची शिकार झाली असावी. या पानबुडीचा एक ढिगारा तिच्या मागील बाजूचा आणि दुसरा लँडिंग फ्रेमचा आहे. त्यामुळे टायटनचे दोन तुकडे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेची आता चौकशी केली जात आहे.

टायटॅनिक ज्या ठिकाणी बुडाले तो समुद्री भाग धोकादायक का आहे?

टायटॅनिकचे अवशेष उत्तर अटलांटिक महासागरातील कॅनडाच्या न्यूफाउंडलँडच्या किनाऱ्यापासून अंदाजे ३७० मैलांवर आहेत. या सागरी भागात अंधार असून पाणी खूप थंड असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर चिखल आहे आणि तो सतत अस्थिर असतो. समुद्राच्या एवढ्या खोलवर रडारही काम करत नाही. समुद्री तज्ज्ञांच्या मते, समुद्राच्या पृष्ठभागावरील दाब हा वरच्या पृष्ठभागावरील दाबापेक्षा ३९० पट जास्त असतो. त्यामुळे इथून जाणाऱ्या पाणबुडीची भिंत खूप मोठी करण्यात येते जेणेकरून ती दाब सहन करू शकेल. याच्या जवळून कोणी गेल्यास तो त्यात अडकू शकतो. या ठिकाणी पाणबुडी एकदा अडकली की बाहेर पडणे खूप कठीण होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टायटॅनिकच्या अवशेषांचे आकर्षण का?

११२ वर्षांपूर्वी बुडालेले टायटॅनिक जहाजाची कधी न बुडणारे जहाज अशी जाहिरात केली होती. त्याची कधी हिमनगाशी धडक होईल याची कल्पनाच केलेली नसल्याने ते पहिल्याच प्रवासात १५०० प्रवाशांना घेऊन बुडाले. त्यावर हॉलिवूडने ऑस्कर पुरस्कारांचा पाऊस पाडणारा चित्रपट काढून त्याला एक आख्यायिका करून टाकले. त्यामुळे टायटॅनिकबद्दल प्रचंड आकर्षण वाढले. त्यानंतर या मोहिमा सुरू झाल्या.

‘मिस्टर टायटॅनिक’चा प्रवास संपला

टायटन पाणबुडीतून प्रवास केलेले फ्रान्सचे एक्सप्लोरर (शोधक) पॉल हेन्री नार्गेलेट (French oceanographer and Titanic expert Paul-Henri Nargeolet) यांच्या कुटुंबाने त्यांचा उल्लेख जगाच्या वर्तमान इतिहासातील सर्वात महान खोल समुद्र शोधकापैकी एक म्हणून केला आहे. ७७ वर्षीय पॉल हेन्री नार्गलेट हे ‘मिस्टर टायटॅनिक’ म्हणून ओळखले जात होते. बुडालेली जहाजे शोधण्यात त्यांचे कौशल्य होते. यामुळे त्यांना ‘मिस्टर टायटॅनिक’ हे नाव देण्यात आले होते. पॉल हेन्री नार्गेलेट यांचे पाण्याखालील संशोधनाच्या जगात मोठा नावलौकिक आहे.

पाणबुडीवरील पाच प्रवाशांमध्ये पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश उद्योजक शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद यांचाही समावेश होता. या दोघांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

 हे ही वाचा :

Back to top button