बळीराजाचे डोळे आभाळाकडे..! पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्या | पुढारी

बळीराजाचे डोळे आभाळाकडे..! पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्या

दीपक देवमाने

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृतसेवा : यंदा मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने सुरुवातीला वर्तविला होता. परंतु मान्सून केरळमध्ये दखल होताच अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाल्याचा परिणाम मान्सूनच्या पावसावर झाल्याने शेतकर्‍यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणीपूर्व मशागती शेतकर्‍यांनी पूर्ण केल्या आहेत. परंतु मान्सूनने हजेरी लावली नसल्याने शेतकर्‍यांचे डोळे पावसाकडे लागले आहे.

तालुक्यातील शेतकर्‍यांनी खरीप पिकांच्या पेरणीसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. पेरणीसाठी शेतातील सर्व कामे पूर्ण केली आहेत. कृषी विभागदेखील खते, बियाणे पुरवठा करण्यासाठी सज्ज झाला आहे. खरीप पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी जमिनीची पेरणीपूर्व नांगरणी, कोळपणी, पाळी, मोगडासह जमिनीची मशागत करून पेरणीसाठी शेत तयार करून ठेवले आहे. परंतु पावसाने आठवडा झाला तरी हजेरी लावली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

तालुक्यात खरीप पेरणीसाठी 57 हजार 200 हेक्टर इतके क्षेत्रावर लागवड होणार असल्याची माहिती तालुका कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. गतवर्षी देखील पावासाच्या लहरीपणामुळे खरिपाचे उत्पादन घटले होते. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. यंदा पाऊस सर्वसाधारण राहणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते. परंतु मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा उलटला असतानाही पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे.

उत्पादनावर परिणाम होण्याची भीती?

यंदा मात्र मान्सूनपूर्व पाऊसही झाला नसून मान्सूनही लांबणीवर पडला आहे. या आठवडाभरात पावसाने हजेरी लावली नाही तर पेरणी लांबणीवर जाणार असल्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. पेरणी जूनअखेरपर्यंत लांबल्यास पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकर्‍यांनी केली आहे.एकंदरीत लांबलेला पाऊस शेतकर्‍यांच्या चिंतेत भर घालणारा ठरतो आहे. बीजप्रक्रिया करून

पेरणी करा : सुपेकर

खरीप हंगामात पेरणीयोग्य पावसाला अजून सुरुवात झालेली नसून शेतकर्‍यांनी पूर्व मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावीत, तसेच 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा विचार करावा 30 जूनपूर्वी पेरणीयोग्य पाऊस झाल्यास खरिपातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग, सूर्यफूल, मका, कापूस या पिकांची पेरणी करण्यास काहीही हरकत नाही. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातील योग्य पाऊस झाल्यास मूग आणि उडीद वगळता इतर सर्व पिकांची पेरणी करता येऊ शकते. बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी शेतात प्रकाश सापळे लावावेत.

हेही वाचा

राहुरी : रणरागिणीने बिबट्याचा हल्ला परतवून लावला..!

पुणे : मुलगा राहिला महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्येच ! रेल्वे अधिकार्‍यांच्या सतर्कतेने झाली कुटुंबीयांशी भेट

राहुरी : जलतरण तलाव वर्षात पूर्ण : आ. प्राजक्त तनपुरे

Back to top button