पुणे : मुलगा राहिला महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्येच ! रेल्वे अधिकार्‍यांच्या सतर्कतेने झाली कुटुंबीयांशी भेट | पुढारी

पुणे : मुलगा राहिला महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्येच ! रेल्वे अधिकार्‍यांच्या सतर्कतेने झाली कुटुंबीयांशी भेट

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रात्रीची वेळ… स्थानकावर पसरलेली शांतता… कुटुंबीयांसोबत घरी जाण्याच्या तयारीत असतानाच मुलगा चुकून महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये चढला… गाडी सुटली… पालकांना काही चढता आले नाही… त्यामुळे पालकांची चांगलीच तारांबळ उडाली अन् ते रडायलाच लागले. मात्र, रेल्वे अधिकार्‍यांच्या सतर्कतेने वडिलांशी त्याची भेट झाली. रोशनकुमार भीम पुजारी (वय 11, मूळ रा. बिहार) असे या मुलाचे नाव आहे. पुणे रेल्वे स्थानकावर सोमवारी पालकांजवळून निसटून तो महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये चढला होता. रेल्वे अधिकारी अनिल तिवारी यांनी त्याच्या वडिलांना धीर देत, त्यांची मुलाशी भेट करून दिली.

…अन् अखेर मुलगा सापडला
तोपर्यंत गाडी मिरज स्थानकापर्यंत पोहचली होती. मुलगा काही सापडेनाच. तिवारींनी सोना यांना सीटांखाली मुलाचा शोध घेण्यास सांगितले. पुन्हा शोध सुरू झाला, तोपर्यंत संपूर्ण रात्र संपून उजाडले होते अन् सात-आठ डबे शोधल्यावर एका सीट खाली घाबरलेल्या अवस्थेत अखेर मुलगा सापडला. अन् पालकांच्या जीवात जीव आला.

मुलाच्या वडिलांनी मानले रेल्वे अधिकार्‍यांचे आभार
त्या मुलाला कोल्हापूर स्थानकावर महालक्ष्मी एक्स्प्रेसचे चालक आणि सोना यांनी स्टेशन मास्तरांकडे सोपविले. त्यानंतर तिवारी यांनी कुटुंबीयांना महाराष्ट्र एक्स्प्रेसने कोल्हापूरकडे रवाना केले. तेथे त्यांची मुलाशी भेट झाली. कुटुंबीयांनी स्टेशन मॅनेजर तिवारी यांच्यासह सर्व रेल्वे कर्मचार्‍यांचे आभार मानले.

मुलाला शोधताना येत होते अपयश…
कर्मचार्‍यांनी सर्व डब्यांत मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. इतक्यात तिवारी यांना त्यांचा सहकारी मित्र चीफ तिकीट इन्स्पेक्टर सोना याच गाडीत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ सोना यांना एस 4 डब्यामध्ये मुलाचा शोध घ्यायला लावला. मात्र, सोना यांना आणि इतर गाडीतील रेल्वे कर्मचार्‍यांना मुलगा काही सापडला नाही. तिवारींनी मुलाचा फोटो व्हॉट्स अपवरून सोना यांना पाठविला अन् मुलाचा सर्व डब्यांमध्ये शोध सुरू झाला.

आईने फोडला हंबरडा
पुणे रेल्वे स्थानकावर गाड्यांचे नियोजन करण्यात तिवारी आपल्या कार्यालयात मग्न असताना एक दाम्पत्य रडत त्यांच्याकडे आले होते. ते त्यांना म्हणाले, ’महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये चढत असताना आमचा मुलगा एस 4 डब्यामध्ये चढला, पण आम्ही या डब्यात चढू शकलो नाही. तेवढ्यात गाडी गेली. आता आम्ही काय करू?’ त्या मुलाच्या आईने तर हंबरडा फोडला. ही स्थिती लक्षात घेत तिवारी यांनी कंट्रोल रूम गाठत महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये रेल्वे कर्मचार्‍यांशी संपर्क साधत गाडी निरा स्थानकावर थांबविण्यास सांगितली. मात्र, गाडीला उशीर झाल्यामुळे ती निरा स्थानकावर थांबणार नव्हती.

हे ही वाचा : 

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे काळाच्या पडद्याआड

पुणे : जलतरणपटूंची सुरक्षा रामभरोसे ! प्रशिक्षित प्रशिक्षक आणि लाईफ गार्डचा पत्ताच नाही

Back to top button