राहुरी : जलतरण तलाव वर्षात पूर्ण : आ. प्राजक्त तनपुरे | पुढारी

राहुरी : जलतरण तलाव वर्षात पूर्ण : आ. प्राजक्त तनपुरे

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहुरी शहराच्या वैभवात भर घालणार्‍या साडेतीन कोटींच्या अद्ययावत बंदिस्त जलतरण तलावाचे काम एक वर्षात पूर्ण होईल. शेजारी बगीच्या, व्यायामाची व्यवस्था केली जाईल. जॉगिंग ट्रॅकच्या दुसर्‍या टप्प्यातील कामाला गती देऊन ठिक-ठिकाणी सेल्फी पॉईंट, तीन ठिकाणी वेशी उभारल्या जातील, असे सांगत राहुरी पालिकेच्या मागील निवडणुकीत दिलेल्या वचन पूर्तीचा आनंद आहे, असे आ. प्राजक्त तनपुरे म्हणाले.

राहुरी शहरात बिहाणी प्लॉट येथे जलतरण तलावाच्या शुभारंभप्रसंगी आ. तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी विलास महाराज मदने होते. माजी नगराध्यक्ष अनिल कासार, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब उंडे, विलास तनपुरे, प्रकाश भुजाडी, विलास वराळे, नामदेव वराळे, नानासाहेब गाडे, धोंडीभाऊ सोनवणे, अशोक पलघडमल, सोमनाथ गाडेकर यावेळी उपस्थित होते.
आ. तनपुरे म्हणाले, नगराध्यक्षपदाच्या तीन वर्षांच्या काळात राज्यात भाजपा सरकार होते. त्यांचा फक्त कमळाची सत्ता असलेल्या नगरपरिषदांना निधी देण्याचा एकतर्फी अजेंडा होता.

राहुरी पालिकेची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने नागरिकांच्या मुलभूत समस्यांची कामे तीन वर्षात मार्गी लावली. आमदार झाल्यावर महाविकास आघाडीच्या काळात राज्यमंत्रीपदी कामाची संधी मिळाली. नगरविकास राज्यमंत्री असताना राहुरी पालिकेच्या विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला. पिण्याची पाणी योजना मार्गी लावली. ते काम अंतिम टप्प्यात आहे. भुयारी गटारीच्या कामाचा पालिकेत ठराव करून, कन्सल्टंटची नेमणूक केली.

आराखडा करून घेतला, परंतु भुयारी योजना एचटीपी प्लांटच्या जागेच्या वादातून रखडल्याची उदाहरणे मंत्रीपदावर असताना निदर्शनास आल्याचे सांगत राहुरीच्या आराखड्यातील एचटीपी प्लांटच्या जागेत बदल करून, ज्ञानेश्वर उद्यान येथे जागा निश्चित केली. आराखड्यात बारकाईने बदल करून भुयारीचे काम निर्वेध होईल, असा प्रस्ताव करुन एमजीपी कार्यालयात पाठवला. दरम्यान, सरकार बदलले. आमची फाईल लालफितीत प्रवास करून अंतिम मंजुरीस गेली. विरोधकांनी श्रेयवाद सुरू केला. नागरिकांना माहिती आहे, भुयारीचे 80 कोटींच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होईल, असे आ. तनपुरे यांनी सांगितले.

हेही वाचा

पुणे : निश्चित संख्या नसल्याचा दिव्यांगांना फटका ; लोकसंख्या सर्वेक्षण करण्याची मागणी

पुणे : वर्चस्ववादापोटी आदिवासींची पिळवणूक ; ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत

Back to top button