राहुरी : रणरागिणीने बिबट्याचा हल्ला परतवून लावला..! | पुढारी

राहुरी : रणरागिणीने बिबट्याचा हल्ला परतवून लावला..!

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मादी बिबट्याने चालत्या दुचाकीवरील महिलेसह पुतण्या व चिमुरड्यावर हल्ला केल्यानंतर महिलेने धाडसाने प्रसंगावधान राखत बिबट्यावर हातातील बादलीने प्रतिहल्ला केल्याने बिबट्याने धूम ठोकली अन् तिघांचा जीव वाचला!
तालुक्यातील घोरपडवाडी शिवारात हा थरार (दि. 16) रोजी सायंकाळी 6 वाजता घडला. कडूबाई धोंडिराम पवार (वय 46 वर्षे) त्यांचा पुतण्या गोरक्ष पवार व चिमुरड्यासह शेतातून घरी निघाल्या होत्या. वांगे तोडणीनंतर हातात बादली घेऊन तिघे दुचाकीवरुन घरी निघाले.

राहुरी -म्हैसगाव रस्त्यावर घोरपडवाडी शिवारात बिबट्याची मादी बछड्यांसह दबा धरून बसली होती. दुचाकी जवळ येताच तिने झडप मारली. क्षणार्धात तिघे रस्त्यावर कोसळले. बिबट्याने कडूबाईंवर हल्ला केला. पुतण्यासह चिमुरड्याचा जीव वाचविण्यासाठी कडूबाईंनी जणू रणरागिणीचे रूप धारण करीत बिबट्यावर बादलीने प्रतिहल्ला करुन, ओरडताच लगतच्या शेतकर्‍यांनी धाव घेतली.

कडूबाई यांच्याकडून बादलीने होणारा हल्ला व धावत आलेला जमाव पाहून मादी बिबट्याने बछड्यांसह शेतात धाव घेतली. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कडूबाई यांच्या पायाला चावा घेतल्याने जखम झाली. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविले. पुतण्या गोरक्ष व चिमुरडा कडूबाई यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले. कडूबाईंच्या धाडसाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

हेही वाचा

पिंपरी : पालेभाज्या, टोमॅटो आणि मिरचीच्या दरात वाढ

कोपरगावचे दीड कोटीचे वाचनालय धुळीत

राहुरी : जलतरण तलाव वर्षात पूर्ण : आ. प्राजक्त तनपुरे

Back to top button