नगर : राहुरी नगरपरिषदेला दीड कोटीचे बक्षीस ; माझी वसुंधरा अभियानात नाशिक विभागात प्रथम

राहुरी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : राहुरी नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियानात नाशिक विभागातील 25 ते 50 हजार लोकसंख्येमध्ये प्रथम क्रमांक मिळाला. शासनाकडून दीड कोटी रुपयांचे बक्षिस मिळाल्याने राहुरीकरांकडून समाधान व्यक्त होत आहे. पर्यावरण पूरक कामे करण्याबाबत राहुरी नगरपरिषदेने नेहमीच अग्रक्रमांक राखलेला आहे. कचरा प्रकल्पाला थ्री स्टार नामांकन मिळाल्यानंतर मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या अभियानात राहुरी नगरपरिषदेने उत्तुंग भरारी घेतलेली आहे.
माजी खासदार प्रसाद तनपुरे, डॉ. उषाताई तनपुरे व बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांच्या मार्गदर्शनात तर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे याच्या कुशल नियोजनामुळे राहुरी नगरपरिषदेने पर्यावरण विषयक शहरात चांगली कामे करून दाखविली. पर्यावरण समतोल राखण्याबाबत विशेष मोहिम राबविण्यात पालिकेला यश मिळाले. यासाठी मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या मार्गर्शनामध्ये नगरपरिषदेचे अधिकारी सुभाष बाचकर, राजेंद्र पवार, काकासाहेब आढागळे, राजेंद्र पवार, अभियंता स्वप्नील काकड, भारत मोरे, अर्जुन बर्गे, योगेश सर्जे, शंकर आगलावे, राजेंद्र जाधव, पराग कुलकर्णी, बालाजी कदम आदींनी विशेष परिश्रम घेतले. पश्चात राहुरी नगरपरिषदेला माझी वसुंधरा अभियानात नाशिक विभागात पहिला क्रमांक तर राज्यात आठवा क्रमांक मिळाला. दीड कोटी रुपयांचे बक्षिस मिळाल्याने शहराच्या पर्यावरण पुरक कामांना मोठे पाठबळ लाभणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी बक्षिसाचा वापर
निसर्गाच्या पंचतत्वाच्या संवर्धन, संरक्षणासाठी मिळालेल्या बक्षिसाच्या निधीचा वापर होणार आहे. यामध्ये 50 टक्के निधी हा हरित क्षेत्र वाढविणे यासाठी तर इतर रक्कम पर्यावरण पूरक इतर उपाययोजना करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणपूरक शहर होण्यासाठी मोठी संधी राहुरीकरांना असणार आहे.
हे ही वाचा :
https://pudhari.news/maharashtra/pune/564162/dr-pradeep-kurulkar-news/ar
https://pudhari.news/sampadakiy/564012/only-girls-in-chartered-bureaucracy/ar