

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात वादळाने डिकसळ येथील एका घराचे पत्रे उडून गेले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु राहत्या घराचे छप्पर उडाल्याने संबंधित कुटुंब उघड्यावर आले आहे. डिकसळ येथील उत्तम लक्ष्मण काकडे, कारभारी काकडे, रामदास काकडे, बबन काकडे यांच्या घरांचे पत्रे वादळाने उडून गेले. त्यांच्या चार खोल्यांवरील पत्रे उडून गेले. पावसाने चांगलीच दैना उडवली. जोरदार वार्यामुळे शेतकर्याच्या घरावरील सिमेंटचे पत्रे उडून गेल्यानं मोठे नुकसान झाले.
एवढच नाही घरांवरील पत्रे उडाल्याने घरातील धान्य व घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात महत्त्वाचे कागदपत्रं देखील उडून गेली. संपूर्ण घरात पावसाचे पाणी साचले असल्याने कुटुंबाला राहण्याची गैरसोय झाली आहे. या वादळामुळे हे कुटुंब मात्र उघड्यावर आले आहे. यावेळी सरपंच भाऊसाहेब चौधरी यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली. संबंधित कुटुंबाला भरपाई मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घरावरील छप्पर उडून निवार्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त परिवाराने केली आहे.