दहावी-बारावी राज्य परीक्षा मंडळ आणि केंद्रीय परीक्षा मंडळाच्या (सीबीएससी) परीक्षेत मुलीच टॉपर असतात असे नव्हे, तर 'आयएएस', 'आयएफएस' आणि 'आयपीएस' असे उच्च पदस्थ अधिकारी देशाला देणार्या संघ लोकसेवा आयोगाच्या अवघड परीक्षेचाही भवसागर मुली लिलया पार करू शकतात. हे यंदाच्या संघ लोकसेवा आयोगाच्या निकालाने दाखवून दिले आहे; असे उत्तुंग यश मुली का मिळवतात आणि मुले यात का माघारतात, यामागे मोठे शास्त्रीय कारण आहे.
संघ लोकसेवा आयोगाने 23 मे 2023 रोजी 2022-2023 ही दोन वर्षे चाललेल्या 'यूपीएस'सी परीक्षेचा निकाल जाहीर केला अन् तमाम महिला जगताचे चेहरे आनंदाने उजळून निघाले. या परीक्षेत ईशिता किशोर ही मुलगी देशात पहिली आली. दुसरी टॉपर ही मुलगीच. गरिमा लोहिया असे तिचे नाव. तिच्या पाठोपाठ तिसरा नंबर पटकावला तो उमा हराथी या मुलीने. अखंड दोन वर्षे चाललेल्या या कठीण परीक्षेत, सनदी नोकरशाहीचे यशोशिखर तीन मुलींनी गाठले आहे.
अचंबित करणारी बाब म्हणजे 'यूपीएससी' परीक्षा कॅ्रक करून गुणवत्ता यादीत सर्वोच्च स्थान मिळविण्याचे मुलींचे हे सलग चौथे वर्ष आहे. या चार वर्षांत मुलांना पहिल्या, दुसर्या टॉपर नंबरपासून मुलींनी दूर ठेवले असे म्हणणे कदाचित चुकीचे ठरेल. कारण, मुली करतात तेवढे कठोर परिश्रम करून गुणवत्ता यादीत अव्वल क्रमांक घेण्यात मुले कमी पडली आहेत. वर वर पाहता या यश -अपयशामागे मुले आणि मुली असा लिंगभेद वाटत असला, तरी तसे मुळीच नाही. करिअरची ही सर्वोच्च परीक्षा जरी असली, तरी या परीक्षेच्या तयारीकडे बघण्याचा मुलींचा द़ृष्टिकोन, परिश्रम घेण्याची तयारी, अभ्यासातील एकाग्रता आणि त्यातील सातत्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असल्याचे दिसून येते.
सनदी नोकरशहा बनलेल्या तिन्ही मुलींमध्ये महाराष्ट्रातील एकही मुलगीही नाही, दुर्दैवाने नमूद करावे लागेल. कारण, या परीक्षेसाठी हवे असलेले शैक्षणिक वातावरण, त्यासाठी आवश्यक प्रभावी कोचिंग क्लासेस आणि राज्य सरकारचा मराठी मुलांबाबतचा या परीक्षेसंदर्भातील एकूणच द़ृष्टिकोन मराठी मुलांच्या यशाआड येत असल्याचे दिसते. उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, तेलंगणा या राज्यांमध्ये 'यूपीएससी' सेल स्थापन करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात फक्त 'आयएएस' सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र स्थापन केले आहे, जे सध्या पांढरा हत्ती ठरले आहेत.
देशात पहिली आलेली ईशिता किशोर ही तेलंगणाची आहे. ती अर्थशास्त्राची पदवीधर आहे. दिल्ली विद्यापीठांतर्गत असलेल्या श्रीराम कॉमर्स कॉलेजमधून तिने पदवी संपादन केली आहे. केवळ अॅकॅडमिक शिक्षणातच ईशिताने प्राविण्य संपादन केले असे नव्हे, तर ती पट्टीची अॅथलेट आहे. राष्ट्रीय स्पर्धा तिने गाजवल्या आहेत.
गुणवत्ता यादीत देशात दुसरी येण्याचा बहुमान पटकावणारी गरिमा लोहिया ही बिहारची. तिने दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली आहे. तर तिसरी उमा हराथी हीसुद्धा तेलंगणाचीच. तिने हैदराबाद 'आयआयटी'मधून बी.टेक. केले आहे. मात्र, तिने मानववंशशास्त्र हा वैकल्पिक विषय घेऊन 'यूपीएससी' क्रॅक केली.
माध्यमिक शालांत परीक्षा असो, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा असो की, 'यूपीएससी' परीक्षा, गुणवत्ता यादीत मुलींचाच डंका वाजतो. मुली असे उत्तुंग यश कसे संपादन करू शकतात? त्यांच्यामध्ये असे कोणते सामर्थ्य आहे, जे मुलांमध्ये नाही? मुलींच्या शैक्षणिक कर्तबगारीची कारणमीमांसा एका मानसशास्त्रज्ञाने शास्त्रीय पद्धतीने केली आहे.
कॅनडाच्या न्यू ब—ुस्किन विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॅनियल व्होयर आणि सुसान व्होयर यांनी जगातील अनेक संशोधनपर शोधनिबंधातील शास्त्रीय माहिती एकत्रित करून त्याचे मुला-मुलींच्या मानसशास्त्रीय पातळीवर विश्लेषण केले. या संशोधनाअंती त्यांनी निष्कर्ष काढला की, क्लासरूम असो की अभ्यास, मुली यावेळी कमालीच्या एकाग्र असतात. मुली संपूर्ण फोकस संबंधित विषयावर करीत असल्याने त्यांची स्मरणशक्ती तरतरीत बनते.
एकाग्रतेमुळे केलेला अभ्यास, संकलित माहिती आणि संपादन केलेले ज्ञान 'रिकॉल' करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण झालेले असते. मुलांमध्ये सरासरी एकाग्रतेचा दुष्काळ असल्याचे या संशोधनात समोर आले आहे. शिवाय, शतकानुशतके पुरुष हे वर्चस्ववादी, आक्रमक आणि सामर्थ्य या मनोवस्थेत असतात, तर स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. मुलांचे संगोपन आणि कुटुंबाचा सांभाळ करणे, घर चालविणे आणि संसाराचे व्यवस्थापन करण्याचे धडे त्यांना उपजतच दिले जातात.
अशा अवस्थेतून बाहेर पडण्याच्या मानसिकतेतून मुली करिअर ओरियंटेड झाल्याने त्या ध्येयाप्रति कटिबद्धता आणि संपूर्ण झोकून देण्याच्या निश्चयामुळे त्या कोणत्याही परीक्षेत टॉपर म्हणूनच डंका वाजवतात, असा निष्कर्ष डॅनियल आणि सुसान व्होयर या मानसशास्त्रज्ञांनी काढला आहे.