चितळी : जंताच्या औषधामुळे कालवडींना झाली विषबाधा; तीन कालवडींचा मृत्यू | पुढारी

चितळी : जंताच्या औषधामुळे कालवडींना झाली विषबाधा; तीन कालवडींचा मृत्यू

चितळी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कालवडींना जंत झाल्याने पशुवैद्यकीय दवाखान्यातून आणलेले जंताचे औषध पाजल्याने एकाचवेळी दहा ते बारा कालवडींना विषबाधा होवून त्यातील तीन कालवडींचा मृत्यू झाल्याची घटना राहता तालुक्यातील चितळी येथे घडली. पशुसंवर्धन विभागाच्या राहाता व नगर पशुवैद्यकीय पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन उर्वरित पशुधनास पुढील उपचार केल्याने इतर कालवडी वाचवण्यात यश मिळाले. यामुळे चितळी परिसरात खळबळ उडाली.

याबाबतची माहिती अशी, चितळी येथील दूध उत्पादक हरिहर गिताराम वाघ यांच्याकडे असलेल्या कालवडीच्या पोटात जंत झाल्याने जंत मारण्यासाठी चितळी पशुवैद्यकीय दवाखान्यातून जंत मारण्याचे औषध आणले. दि.1 जून रोजी ते औषध कालवडींना पाजले. मात्र त्यानंतर सदर कालवडींना गुंगी येण्यास सुरुवात झाली. वाघ यांच्या हे लक्षात आले. विषबाधेतून रात्री 1 व पहाटे 2 अशा तीन कालवडींचा जागेवर मृत्यू झाला. ही माहिती पशुवैद्यकीय अधिकारी बाचकर यांनी सांगितली. पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल होत तातडीने पुढील उपचार केले.

बाचकर यांनी घटनेची वरिष्ठांना माहिती दिल्याने राहाता येथील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ नगर येथील जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा सहआयुक्त मुकुंद राजळे यांनी घटनास्थळी दाखल होत औषध उपचाराबाबत योग्य सूचना दिल्या.

यावेळी राहाता पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. प्रज्ञा ओहोळ, पशुधन विकास अधिकारी डॉ. वेधे, बाभळेश्वर येथील डॉ. भालेराव, वाकडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी, डॉ. भांड, पशुधन पर्यवेक्षक डॉ. कापडी वी. लहारे, चितळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाचकर, बाबासाहेब वाघ, अशोक वाघ, रामराव वाघ, सागर वाघ, कैलास वाघ, अनिल तनपुरे, नानासाहेब वाघ आदींनी पशुधन वाचवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

पशुवैद्यकीय दवाखान्यातून आणलेले जंत नाशक औषध आम्ही योग्य प्रमाणात दिले होते. मात्र ते दिल्यानंतरच कालवडींना त्रास होऊन, त्यात तीन दगवल्या असल्याने मोठे नुकसान झाले आहे. दिलेल्या औषध कंपनीची चौकशी व्हावी व नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी हरिहर गिताराम वाघ यांनी केल आहे.

रिपोर्ट आल्यानंतर निर्णय : उपायुक्त तुंबारे

मृत कालवडीचे शवविच्छेदन करून त्याचे व बाधित कालवडीचे रक्ताचे नुमने पुणे येथील पशुसंवर्धन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणार आहोत. औषधाची मात्रा कमी-अधिक प्रमाणात झाल्यावर असे होऊ शकते. मात्र दिलेले हे औषध पूर्ण राहाता तालुक्यात वापरले जाते. त्यामुळे रिपोर्ट आल्यानंतर खरे कारण स्पष्ट होईल.

जीवदान देणार्‍या डॉक्टरांचा सन्मान

अहमदनगर व राहाता येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व डॉक्टर यांनी सलग पाच तास घटनास्थळी ठाण मांडून कार्यरत होते. तातडीने उपचार बाधित जनावरांना जीवदान दिल्याबद्दल चितळी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच दीपाली वाघ यांनी अधिकारी व डॉक्टराचा सन्मान केला. तसेच कालवडी मृत पावल्याने मोठे नुकसान शेतकरी हरिहर वाघ यांचे झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळणे कामी ना. विखे पाटील यांची भेट घेणार असल्याचे सरपंच दीपाली वाघ यांनी सांगितले.

हेही वाचा 

पिंपरी : दुकानदारांना आरक्षित भूखंड देण्यास पीएमआरडीएकडून टाळाटाळ

रूईछत्तीशी : वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण; पाणवठे उभारण्याची गरज

‘आप’ची स्वराज्य यात्रा घडवणार बदल, पिंपरी शहरात आज आगमन

Back to top button