रूईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील गुंडेगाव, राळेगण, गुणवडी, वाटेफळ, रूईछत्तीशी गावांच्या माळरानावर सध्या पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती सुरु झाली आहे, नगर तालुक्यातील गुंडेगावं व वाटेफळ येथील वनक्षेत्रात हरीण, काळवीट , ससे पाण्यासाठी सैरभैर धावू लागले आहेत. रखरखत्या उन्हाने सध्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी गर्भगिरीच्या डोंगरांतील हरीण, काळवीट यांनी सीना पट्ट्यात वास्तव्य केले होते, गर्भगिरीपेक्षा सीना नदीच्या पट्ट्यात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने वन्यप्राण्यांची तहान भागली जात होती.
आता मात्र नगर तालुक्यातील दक्षिण भागात देखील माळरानावर पाण्याची चणचण भासू लागल्याने वन्यप्राण्यांचे हाल होऊ लागले आहेत, यावर वनखाते कोणतेही ठोस पावले टाकताना दिसत नाही, मार्च,एप्रिल आणि मे महिन्यांत तीव्र उन्हाळा असल्याने वन्यप्राणी दुपारच्या वेळेस पाण्यासाठी वणवण फिरतात आणि त्यांना पाण्याचा सुगावा लागला नाही, तर त्यांना पाण्यावाचून व्याकुळ व्हावे लागते, अशी परिस्थिती गेल्या तीन महिन्यांपासून निर्माण झाली आहे, येथून रेहकुरी अभयारण्य जवळ असल्याने काळवीट याच पट्ट्यातून मार्गक्रमण करतात.
या भागात जागजागी पाणवठे तयार करणे गरजेचे आहे, गेल्या कित्येक वर्षापासून वनविभागाच्या ही बाब लक्षात येत नसल्याने वन खात्याचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे, कित्येक वन्यप्राण्यांना पाण्यावाचून मरावे लागते, हे देखील चिंताजनक आहे,
उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्याची व्यवस्था करणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे वनविभागाने लवकर यावर कार्यवाही करावी, अन्यथा वन्यप्राण्यांचे अस्तित्त्व नाहीसे होण्यास वेळ लागणार नाही.
जागजागी पाणवठे तयार करून त्यात पाणी सोडणे आवश्यक आहे, पाणवठे तयार केले, तर निसर्गमित्र व प्राणीमित्र खासगी स्वरूपात पाणी उपलब्ध करुन देतील. यासाठी वनविभागाने सहकार्य करणे गरजेचे आहे, वनविभाग उन्हाळ्यात कोणतीही कार्यवाही करत नसल्याने हरीण, काळवीट, ससे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.