पिंपरी : दुकानदारांना आरक्षित भूखंड देण्यास पीएमआरडीएकडून टाळाटाळ | पुढारी

पिंपरी : दुकानदारांना आरक्षित भूखंड देण्यास पीएमआरडीएकडून टाळाटाळ

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) निगडी व्यापारी संघटनेसाठी निगडी, प्राधिकरण, सेक्टर क्रमांक 24 येथील दुय्यम सुविधा केंद्रातील भूखंड क्रमांक 8 व 9 येथील जागा आरक्षित करण्यात आली होती. मात्र, संघटनेने अधिमूल्य भरणा व आवश्यक कागदपत्रे मुदतीमध्ये सादर न केल्याने ते आरक्षण रद्द केल्याचा दावा करीत, ती जागा बांधकाम व्यावसायिकांना वाढीव दराने विकली आहे, असा अहवाल पीएमआरडीएने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.

त्यावरून बाधित दुकानदारांना जागा देण्यास पीएमआरडीए दिशाभूल करून टाळाटाळ करत आहे, असा आरोप व्यापार्‍यांनी केला आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील निगडी ते दापोडी मार्गाचे रुंदीकरण करताना निगडी येथील अनेक दुकाने तोडण्यात आली. त्या वेळी बाधित दुकानदारांना त्या वेळच्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने 3 हजार 800 चौरस मीटर जागा देण्याचा रितसर ठराव मंजूर करत जागा आरक्षित केली होती. त्यानुसार, बाधित दुकानदारांनी प्रत्येकी 10 लाख रुपये प्राधिकरणाकडे जमा केले. यासंदर्भात बाजीराव काळभोर यांनी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्याने दुकानदारांचे 10 लाख रुपये परत करण्यात आले. त्यामुळे त्या भूखंडावर दुकानदारांचा कोणताही हक्क राहिलेला नाही, असा दावा पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल महिवाल यांनी अहवालात केला आहे.

राज्य शासनाच्या 7 जून 2021 च्या विलीनीकरणाच्या अधिसूचनेनुसार त्या जागेचा ताबा पीएमआरडीएकडे आला आहे. त्या जागेवर व्यापारी भूखंड तयार करून त्याची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 22 ऑगस्ट 2022 ला ई-लिलाव करून सर्वोच्च बोली लावणार्‍या बांधकाम व्यावसायिकांना जागेची विक्री करण्यात आली आहे. पीएमआरडीएच्या नियमात जागा वाटपाची तरतूद नाही.

निगडी व्यापारी संघटना प्रचलित रेडिरेकनरनुसार जागेची रक्कम भरण्यास तयार असल्यास भविष्यात होणार्‍या लिलावप्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेता येईल, असे अहवालात महिवाल यांनी म्हटले आहे. पीएमआरडीएने मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना दिलेल्या अहवालावरून निगडी व्यापारी संघटनेस जागा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी महिवाल हे मनमर्जी कारभार करीत असून, त्याविरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निगडी व्यापारी संघटनेसह सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिला आहे.

हेही वाचा:

पुण्यात जाहिरात फलकांनी कोंडला झाडांचा श्वास! पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

नववधूला गाय अन् बैलाची अनोखी भेट ! पुण्यातील शेतकऱ्याची कमाल

जेजुरीकरांचे आठव्या दिवशीही धरणे आंदोलन सुरूच; दिवटी बुधली पेटवून मोर्चा

 

Back to top button