

नगर : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे 2022 रोजी दूरदृश्य प्रणाली माध्यमातून प्रधानमंत्री नावाने सुरू असलेल्या 13 केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी शिमला येथून थेट संवाद साधणार आहेत. सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्यातील 260 योजना लाभार्थ्यांशी ते संवाद साधतील, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले, बुधवारी मात्र फक्त 5 लाभार्थी शेतकर्यांशीच मोदी थेट संवाद साधणार असून 255 लाभार्थी उपस्थित असतील, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले.
सामाजिक-आर्थिक-जातनिहाय जनगणनेत मागास ठरलेल्या प्रत्येक वंचित घटकाला या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली पाहिजे. हा मुख्य उद्देश या योजनांचा आहे. यादृष्टीने या योजनेची यशस्विता व उपयोगिता जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या संवाद कार्यक्रमाचे देशपातळीवर आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे राष्ट्रीय प्रसारण दूरदर्शनवरून अहमदनगर येथील या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट प्रसारण पहाता येणार आहे. प्रत्येक योजनेचे 20 असे जिल्ह्यातील 260 लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यातील पीएम किसान योजनेच्या 5 लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार असल्याचे कृषी विभागाने अहमदनगर जिल्हा प्रशासनाला कळविले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गणांची रचना पूर्ण झाली आहे. नगर तालुक्यातील नागरदेवळे या गटाचा समावेश असल्याचे आयोगाला पाठविलेल्या अहवालात नमूद आहे. हा अहवाल गेल्यानंतर शासनाने नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या तीन ग्रामपंचायती मिळून नागरदेवळे नगरपालिका घोषित केली. त्याचाही अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. त्यामुळे नागदेवळे गटाचा निर्णय आता आयोगाच्या पुढील सूचनेनुसार केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.