

नगर : पुढारी वृत्तसेवा : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिध्दटेक येथील सिद्धीविनायक गणपती मंदिराचा कायापालट होणार आहे. त्यासाठी अर्थ व नियोजन विभागाच्या वतीने 8 कोटी 29 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जिल्हा कार्यकारी समितीने कामाचा आराखडा मंजूर केला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
राज्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र तसेच अष्टविनायक तीर्थस्थळांचा विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील पाच, पुणे जिल्ह्यातील दोन व नगर जिल्ह्यातील सिध्दटेक अष्टविनायक मंदिराचा समावेश आहे. यापूर्वी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने निधी उपलब्ध केला जात होता. आता मात्र, राज्याच्या अर्थ व नियोजन विभागाच्या वतीने निधी उपलब्ध केला जाणार आहे.
मंगळवारी पुणे विभागीय आयुक्तांनी ऑनलाईन बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, कर्जतचे शाखा अभियंता सुभाष शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले हे जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली सिध्दटेक मंदिराच्या कायापालट करण्यासाठी 8 कोटी 29 लाखांच्या खर्चाचा आराखडा तयार केला आहे. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर हा आराखडा सादर होणार आहे. या समितीच्या मान्यतेनंतर हा आराखडा राज्याचे मुख्य सचिव अध्यक्ष असलेल्या उच्चाधिकार समितीपुढे जाणार आहे. या समितीने मान्यता दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता घेतली जाणार आहे. महिनाभरात सिध्दटेक विकास आराखड्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर कामास सुरुवात होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.
मंदिराच्या घडीव बांधकामासाठी दीड कोटी, संगमरवरी काढून जुने दगडी बांधकाम 1 कोटी, घुमट बांधकाम 50 लाख, अतिक्रमण हटविणे व आवश्यक सुविधांसाठी 30 लाख रुपये, दीपमाळ व सभामंडपची भिंत बांधकाम दीड कोटी, माहिती फलक व मंदिर रोषणाई 50 लाख, प्रवेशव्दार बांधकाम 15 लाख अशी तरतूद आराखड्यात करण्यात आली आहे.