

शेवगाव तालुका : रमेश चौधरी : शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत 10 जागा सर्वसाधारण, तर 10 सर्वसाधारण महिला, दोन अनुसुचित जाती महिला व दोन अनुसुचित जाती सर्वसाधारण जागेसाठी आरक्षीत करण्यात आले आहेत. प्रभागातील फेरबदल व आरक्षण पाहता काही जुन्या नव्या इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले. तर ते इतर प्रभागात चाचपणी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
शेवगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी 12 प्रभागातील 24 सदस्य आरक्षणामध्ये सोमवारी नियंत्रण अधिकारी तथा भूसंपादन उपजिल्हाधिकारी संदीप चव्हाण, तहसीलदार छगन वाघ, नगरपरिषद मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांच्या उपस्थितीत आबासाहेब काकडे विद्यालयाच्या प्रज्ञा मुळे, श्रुती जायभाये, स्नेहा क्षीरसागर, श्रावणी लातुरकर, सपना गायकवाड या मुलींच्या हस्ते तहसील कार्यालयात चिठ्या टाकून सोडत काढण्यात आली. यात प्रभाग एक अनु. जाती सर्वसाधारण, सर्व साधारण महिला, प्रभाग पाच अनु.जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग नऊ अनु.जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग 10 अनु.जाती सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, असे आरक्षीत झाले असून, अन्य प्रभाग सर्वसाधारण महिला व सर्वसाधारणसाठी निश्चित करण्यात आले.
या नगरपरिषद आरक्षणाने काही इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.ज्या प्रभागात त्यांना उमेदवारी अपेक्षित होती, तेथे त्यांनी संपर्क अभियान सुरू केले होते; मात्र आता ते प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना अन्य प्रभागात आपली दाळ शिजणार का? याची चाचपणी करावी लागणार. एकूण 10 प्रभागात 10 सर्वसाधारण महिला सदस्य राखीव असल्याने पुरुषांची मोठी अडचण झाली आहे. गत निवडणुकीत काही जुन्या महिला राखीव प्रभागातून निवडून आलेल्या नगसेविकांचे पती संधी आल्याने या निवडणुकीत त्या प्रभागातून स्व:ताहा उमेदवारी करण्याची शक्यता आहे. होणार्या नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत फेरबदल करून नवीन निकषाने एका प्रभागात दोन सदस्य संख्या झाली आहे. याचे प्रभागही निश्चित झाले असले, तरी अद्याप काहींना याचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसते.
नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणारे अनेक इच्छुक उमेदवार आता तयारीने मतदारांचा संपर्क करणार असून, पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणार आहेत; मात्र या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचा मोठा बाजार भरणार अशी शक्यताही वर्तविली जात आहे.
सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग 10 'ब' व प्रभाग एक 'ब' थेट आरक्षीत करण्यात आले, तर उर्वारीत प्रभाग 2, 3, 4, 6, 7, 8, 11 व 12 मधील प्रत्येकी 'अ' जागा नगर विकास विभाग अधिसुचना 15 डिसेंबर 2021 मधील तरतुदीनुसार सर्वसाधारण महिलांस थेट निश्चित करण्यात आली.