नगर, पुढारी वृत्तसेवा: धूमस्टाईलने महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून गेलेल्या दोन चोरट्यांना मुद्देमालासह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पारनेर येथे 31 मे रोजी ही धूम चोरी झाली होती. अब्दुल महेंदरदीन खान व सुखचेन केसरसिंग (दोघे रा. छत्रपतीनगर, तपोवन, अहमदनगर) असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
31 मे 2022 रोजी मिलन चौक, पारनेर येथे घरी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेच्या हातातील मोबाईल स्प्लेंडर दुचाकीवर निळ्या व काळ्या रंगाचे शर्ट घातलेले अज्ञात दोन जणांनी बळजबरीने हिसकावून घेऊन गेले. याबाबत कोमल दत्तात्रय जाधव ( रा. करंदी, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक हे गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. या दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुन्हा हा अब्दुल खान (रा. तपोवन, अहमदनगर) याने केल्याची माहिती खबर्याकडून मिळाली. त्यानुसार कटके यांनी पथकाला सूचना दिल्या होत्या. पोलिस पथकाने तपोवन येथे जाऊन आरोपीची माहिती काढली.
अब्दुल खान हा तपोवन येथील छत्रपती नगर येथे राहतो अशी माहिती मिळाल्याने पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचे घराचे आजुबाजूस सापळा लावून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडे कसून चौकशी केली असता, त्याने सुखचेन केसरसिंग (रा. छत्रपतीनगर, तपोवन) याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्या माहितीचे आधारे आरोपीचा साथीदार सुखचेन केसरसिंग यास ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी गुन्ह्यातील चोरलेला 15 हजार रुपयांचा व्हिवो कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पथकातील उपनिरीक्षक सोपान गोरे,हवालदार संदीप पवार, पोलिस नाईक शंकर चौधरी, रवि सोनटक्के, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे व संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
हेही वाचा