सातारा : खुल्या प्रभागावर टपून बसलाय ‘थवा’ | पुढारी

सातारा : खुल्या प्रभागावर टपून बसलाय ‘थवा’

भिलार; मुकुंद शिंदे : पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 10 प्रभागांमधील आरक्षणात खुल्या प्रभागावर इच्छुकांची भाऊगर्दी असून काहींना नवीन प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. पण मोजक्याच विद्यमान सदस्यांना आपल्या सोईचे प्रभाग आले आहेत. या आरक्षणामुळे पाचगणीच्या राजकारणात ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाचगणी पालिकेची मुदत 31 डिसेंबर 2021 रोजी संपली आहे.निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्याने थंड पाचगणीचे राजकीय वातावरण तापले असून इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

शहरात गतवेळी नगराध्यक्षपदाच्या थेट निवडीत लक्ष्मी कर्‍हाडकर या निवडून आल्या व 8 प्रभागातून 17 नगरसेवक निवडून आले होते. परंतु आता 10 प्रभाग करण्यात आले असून यातून 20 नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. या बदलामुळे दोन प्रभागात तीन नगरसेवक वाढले आहेत. सोमवारी आरक्षण सोडतीत प्रभाग 3(अ) व प्रभाग 9(अ) या दोन ठिकाणी अनुसूचित जाती सर्वसाधारण तर प्रभाग 2(अ) व प्रभाग 8(अ) या दोन ठिकाणी अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला 8 जागा, सर्वसाधारण 8 जागा याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.

आरक्षणामुळे अनेकांनी आपले राजकीय पुनर्वसन करण्याची तयारी केली आहे. त्यामध्ये अनेक आजी- माजी नगरसेवकांचा समावेश आहे.सदस्यांची संख्या वाढल्याने अनेक युवा नेत्यांनीही गुडघ्याला  बाशिंग बांधले असून नवीन चेहरेही निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत.

पाचगणी पालिकेच्या इतिहासात पक्षाच्या चिन्हावर निवडणुका कधीही लढवल्या गेल्या नाहीत. अपक्षांच्या माध्यमातून पण नंतर विजयी उमेदवारांची मोट बांधून सत्ता स्थापन केली जाते. माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांनी तीन वेळा नगराध्यक्षपद भूषवले आहे. त्यांचा राजकारणातील असलेला गाढा अभ्यास व त्यांनी घेतलेली ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका यामुळे राजकीय व्यूहरचना गुलदस्त्यात आहे. भाजप तसेच शिवसेना, रिपाइं यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

Back to top button