सूर्यकांत वरकड
नगर : महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या मालकीच्या तोफखाना परिसरात असलेल्या इमारतीला तडे गेले असून, इमारतीत असलेल्या सभागृहाचा पाया खचला आहे. या इमातरीत खालच्या मजल्यावर शिक्षण मंडळाचे काम चालते. दुसरा मजला दादासाहेब रुपवते विद्यालय व ज्युनिअर कॉलेजसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आला. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर मनपाने ती इमारत पाडण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नगरपालिका अस्तित्वात असताना तोफखाना परिसरातील खलिफा व्यायामशाळेजवळ मनपाच्या शिक्षण मंडळाच्या मालकीची मोठी इमारत आहे. एका बाजूला तोफखाना परिसरातील विविध व्यावसायिकांच्या टपर्या आहेत. तर, दुसर्या बाजूला पोलिस मुख्यालय आहे आणि रस्त्याच्या बाजूला खलिफा तालीम आहे. या इमारतीतील तळमजल्यातील सभागृह मनपा शिक्षण मंडळाच्या संसाधन कक्षाचे कामकाज चालते.
तर, दुसरा मजला बहुजन शिक्षण संघ संचलित दादासाहेब रुपवते विद्यालय व ज्युनिअर कॉलेज साठी संस्थेला इमारत भाडेतत्त्वावर देण्यात आलेली आहे. तोफखाना परिसरातील नागरिकांनी शाळेची इमारत खचली असून, त्याला मोठ्या प्रमाणात तडेे गेल्याबाबत मनपाला कळविले होते. दरम्यान, 7 जून 2022 रोजी मनपा शिक्षण मंडळाच्या अधिकार्यांनी तोफखानातील त्या इमारतीतील संसाधन कक्षाचा सभागृह उघडले असता मोठ्या प्रमाणात भिंतीला तडे गेल्याचे दिसून आले.
त्या सभागृहाचा पायाच खचल्याचे निदर्शनास आले. येत्या पावसाळ्यात ही इमारत पडण्याची दाट शक्यता आहे. या इमारतीशेजारी छोटे व्यावसायिक असून, त्यांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे ही इमारत पाडण्याबाबत कार्यवाही करावी, असे अहवाल शिक्षण मंडळाने बांधकाम विभागाला दिला. त्यानुसार बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी इमारतीची पाहणी केली असून, इमारतीचा तडे गेलेला भाग पाडण्याबाबत संबंधित शिक्षण संस्थेला कळविले असल्याचे सांगितले.
इमारतीचा धोकादायक भाग उतरवून घेण्याबाबतच्या प्रस्तावाला आज आयुक्तांनी परवानगी दिली आहे. येत्या दोन दिवसांत त्या इमारतीचा धोकदायक भाग पडण्यात येणार आहे.
सुरेश इथापे, शहर अभियंता, मनपा
हेही वाचा