योग्य नियोजनामुळे ‘मुळा’चे विक्रमी गाळप : यशवंतराव गडाख

सोनई ः मुळा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आली.
सोनई ः मुळा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आली.

सोनई : पुढारी वृत्तसेवा

मागील वर्षात राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन झालें. मुळा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातही अतिरिक्त ऊस होता. संपूर्ण उसाचे गाळप होईल की नाही, याबाबत सभासदांना व ऊस उत्पादकांना शंका होत्या. मात्र, संचालक मंडळ व अधिकार्‍यांनी ऊस गाळपाचे चांगले नियोजन केले. त्यामुळे कारखान्याच्या इतिहासातील सर्वाधिक 15 लाख 30 हजार टन गाळप करून विक्रम प्रस्थापित केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.

मुळा कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता बुधवारी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या हस्ते उसाची शेवटची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. गडाख म्हणाले की, या गळीत हंगामात अतिरिक्त ऊसाचा अंदाज आल्याने संपूर्ण उसाचे गाळप करण्यासाठी अगोदरच नियोजन करण्यात आले होते.

ऊसतोडणी वाहतुकीची त्या प्रमाणात भरती केली होती. दैनंदिन गऴीत 8 ते 9 हजार टनांपर्यंत घेता येईल, यादृष्टीने नियोजन करण्यात आले होते. इथेनॉलचा उभारणीचा हाती घेतलेला प्रकल्पही कार्यान्वित झाला. अनेक आव्हाने आणि अनेक अडचणी समोर असताना त्या सगळ्यावर मात करून या हंगामात 450 कोटी रुपयांची साखर, 20 कोटी रुपयाची वीज आणि 50 कोटी रुपयाचं इथेनॉल तयार केलं. इथेनॉलसाठी घेतलेले कर्जही 2-3 वर्षांमध्ये फिटणार आहे.

या हंगामात जिल्ह्यातले इतर कारखाने ऊस न्यायला तयार नव्हते. कारण प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस होता. पण आपण ऊसतोडणी मजुरांना प्रोत्साहनपर 50 रुपये प्रति टनाप्रमाणे अनुदान दिले. त्यामुळे उसाची आवक वाढली. ऊस संपवता आला. पण शेवटी ऊस दिलेल्या शेतकर्‍यांनाही काही झळ बसली.

अशा शेतकर्‍यांना मदत म्हणून 16 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत गळीत झालेल्या उसाला 75 रुपये व त्यानंतर गळीत झालेल्या उसाला 150 रुपये प्रति टनाप्रमाणे अनुदान दिले. पुढच्या वर्षी सुद्धा 12 ते 13 लाख टन ऊस आहे. पुढचा हंगाम सुद्धा मोठा असणार आहे. तेव्हा अधिकार्‍यांनी आतापासूनच तयार राहिलं पाहिजे. बंद हंगामातली मशिनरीची जी कामे आहेत, ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

प्रारंभी संचालक नीलेश पाटील व त्यांची पत्नी अनिता पाटील, रंगनाथ जंगले व त्यांची पत्नी अलका जंगले यांच्या हस्ते मंत्रोच्चारात पूजाविधी करण्यात आला. त्यानंतर गडाख यांच्या हस्ते गव्हाणीत शेवटची मोळी टाकून गळीत हंगामाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

अ‍ॅड.काकासाहेब गायके व कारभारी जावळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे अधिकारी शरद बेल्हेकर, मुख्य अभियंता ठोंबरे, मुख्य शेतकी अधिकारी विजय फाटके, चिफ केमिस्ट श्रीधर गाढे व पांढरपट्टे, ए. डी. वाबळे, बाळासाहेब दरंदले यांचा प्रतिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. कारखान्याचे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, विश्वासराव गडाख, जबाजी फाटके, रामभाऊ जगताप, नेवाशाचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, अनिल अडसुरे, रामकिसन शिंदे, वहाब शेख, कैलास जाधव, रमेश कराळे, नानासाहेब रेपाळे, कारभारी जावळे, पांडुरंग आप्पा निपुंगे, पी. आर. जाधव, उपसभापती किशोर जोजार, अप्पासाहेब निमसे, शरद जाधव, कर्णासाहेब औटी, सतीश निपुंगे, जालिंदर येळवंडे, रावसाहेब लांडे, आदिनाथ रौंदळ, तसेच सभासद व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन सेक्रेटरी रितेश टेमक यांनी केले.

वेळेत गाळपासाठी पुढाकार घ्यावा

मुळा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूूर्ण उसाचे गाळप वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने पुढच्या काळात हार्वेस्टर मशिनवरसुद्धा अधिक भर द्यावा लागेल. त्यासाठी सभासदांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले. विक्रमी गाळपाबद्दल गडाख यांनी कारखान्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news