सोलापूर : एटीएम फोडले, चोरट्यांचा तब्बल २३ लाखांवर डल्ला | पुढारी

सोलापूर : एटीएम फोडले, चोरट्यांचा तब्बल २३ लाखांवर डल्ला

टाकळी सिकंदर (जि. सोलापूर) : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कुरूल ( ता. मोहोळ) येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएम मशीनचा दरवाजा गॅस कटरने तोडून तब्बल २२ लाख ९९ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली. बुधवार दि. ८ जूनच्या पहाटेदरम्यान ३ वाजून २० मिनिटांच्या सुमारास घडली आहे. काळ्या रंगाचे जर्किंन परिधान केलेल्या आणि चेहरा झाकलेल्या अज्ञात चोरट्याने इतर साथीदारांसह ही धाडसी चोरी केल्याची फिर्याद कामती पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जगताप यांनी कुरुल येथे घटनास्थळी भेट दिली आणि चोरीची माहिती घेऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.

याबाबत कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दि. ८ जून रोजी पहाटे ३ वाजून २२ मिनिटांच्या सुमारास मोहोळ – विजापूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडलीय. कुरुल येथील चौकात बँक ऑफ इंडिया शाखेच्या असलेल्या एटीएम मशीन रुममध्ये चेहरा झाकलेला व काळ्या रंगाचे जर्किंन घातलेला अज्ञात इसम शिरला. त्याने गॅस कटरच्या साहय्याने मशीनचा दरवाजा उचकटून त्यातून २२ लाख ९९ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला.

या रूममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चोरट्याने हिरव्या रंगाचा स्प्रे मारल्याचे दिसून आले. ही घटना सकाळी ८ वाजता बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्याने तत्काळ शाखा प्रबंधकांच्या कानावर घातली. त्यांनी एटीएम मशीनची देखभाल, दुरुस्तीसाठी नेमलेल्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिसेस प्रा.लि या कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली.

बँक अधिकारी व या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लगेचच याबाबत कामती पोलिसांना माहिती दिली. कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली आणि बँक व परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यानंतर सोलापूरवरून ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी एटीएम मशीनरूम मधील व बाहेरील सर्व ठसे घेतले आहेत. याबाबत इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिसेस कंपनीचे अधिकारी अमोल अरुण पवार ( ३६, रा .सोलापूर )यांनी कामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने हे करीत आहेत .

Back to top button