

श्रीगोंदा : पुढारी ऑनलाइन
नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव शिवारात आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कार आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील एक जण जागीच ठार झाला तर इतर पाच जण जखमी झाले आहेत. पाचपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. भास्कर तोरडे रा.रायरा ता. घनसांगवी जि. जालना असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंडहुन नगरच्या दिशेने एम.एच.१२एजे-९३२७ ही कार निघाली होती. पहाटे चारच्या दरम्यान कार घारगाव शिवारातील कन्हेरमळा येथे आली असता समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने समोरून जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की कारचे तोंड दौंडच्या दिशेने झाले.
या अपघातात चालकाशेजारी बसलेले भास्कर तोरडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. कारमधील इतर पाचजण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. धडक दिल्यानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला. धडकेचा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना वाहनातून बाहेर काढून नगर येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीमध्ये पोलीस पती- पत्नीचा समावेश असल्याची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
नगर- दौंड रस्ता नव्याने तयार करण्यात आला असला तरी गेल्या दोन वर्षात रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. रस्ता अरुंद व दुभाजक नसल्याने अपघाताचे प्रमाण लक्षणीय आहे. आज झालेला अपघातही तसाच आहे.
हेही वाचा