देवदर्शनाला जाताना नगर-मनमाड मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्‍यू | पुढारी

देवदर्शनाला जाताना नगर-मनमाड मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्‍यू

राहुरी; पुढारी वृत्तसेवा :

नगर -मनमाड रस्त्यावर कार व  एसटीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातीुल  दोन महिला व सात महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विपूल दीपक तारे (वय ३३  रा. खरगोन, मध्यप्रदेश)  हे पुण्यामध्ये कामासाठी आहेत. ते पत्नी, आई व लहान मुलासह शिर्डी व शनिशिंगणापूर दर्शनासाठी आले होते. शिर्डी येथे साई दर्शन घेतल्यानंतर शनिशिंगणापूर दर्शनासाठी जात हाेते.

नगर-मनमाड रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू होती. गुहा पाट येथे समोरून आलेल्या अहमदनगर-सटाणा या बस गाडी क्र. एम एच १४ बीटी ४५०२ या गाडीला एक्सयुव्ही कारची जोराची धडक बसली.  भीषण अपघातामध्ये कारचा चुराडा झाला.

विपूल यांच्‍या पत्नी प्रतिक्षा विपूल तारे (वय ३१) आई रंजन दीपक तारे (वय ५५) व मुलगा लुनय विपूल तारे (७ महिने) यांचा जागीच मृत्‍यू झाला. विपूल तारे  गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच शिवबा प्रतिष्ठाण, भिमतेज प्रतिष्ठाण, साई प्रतिष्ठाण यांसह रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सहायक पोलिस निरीक्षक मधुकर शिंदे, संजय नर्‍हेडा यांसह पोलिस हवालदार लिपणे, दिनकर गर्जे, रोहित पालवे, रविंद्र कांबळे, चालक लक्ष्मण बोडखे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

याप्रसंगी प्रवाशांसह राजू बोरूडे, वैभव लांबे, ऋषिकेश कोळसे, प्रमोद साळवे, निखील आंबे, कैलास ओहोळ, विवेक लांबे आदींनी तात्काळ धाव घेत अपघातग्रस्तांची मदत करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचलंत का ?

Back to top button