

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची निवडणूक जोरात लढायची म्हणून 'त्यांनी' मोठ्या दणक्यात तयारी केली होती. देवदर्शन यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, वस्तूंचे वाटप आणि कोरोनाकाळात मीच तुमचा भावी नगरसेवक आहे, असे जाणवून देण्याइतपत कार्य केले. फ्लेक्सबाजीही झाली.
आता केवळ तिकीट मिळवून नगरसेवकाची माळ गळ्यात घालण्याचे सोपस्कर बाकी आहेत, इथवर चर्चा झाली. मात्र, या उत्साहावर मंगळवारी सकाळी पाणी फिरले.
काम केले एकीकडे आणि प्रभाग गेला दुसरीकडे, अशी अवस्था झाल्याने या आणि अशा इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आता नवीन प्रभागात दखल घेणार कोण अन् इथे केलेल्या खर्चाचे काय? अशा विचाराने या इच्छुकांनी डोक्याला हात लावला आहे.
कोरोना आणि आरक्षणाच्या मुद्यावर अडकलेली महापालिका निवडणुकीची गाडी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेच्या प्रारुप यादीमुळे मार्गी लागली आणि अखेर बिगुल वाजला.
हरकती-सूचना आणि त्यापुढे इतर सोपस्कर असले तरी पहिला गिअर पडणार असल्याने विद्यमान नगरसेवकांबरोबरच इच्छुकांचे लक्ष लागून राहिले होते.
चारचे तीन प्रभाग होणार असल्याने फोडाफोड अटळ होती. त्यामुळे या यादीकडे लक्ष लागले होते. काहीही होवो, यंदा संधी सोडायची नाही म्हणून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कामाला लागलेल्या इच्छुकांना धागधुक होती.
यापैकी अनेकांचा हिरमोड झाला. निवडणूक लागल्यावर बघू… अशा काठावर बसलेल्या इच्छुकांचा निर्णय घेण्यासाठी मार्ग मोकळा झाला.
मात्र, ज्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी खर्च केला त्यांची गोची झाली. प्रभाग गृहीत धरुन त्यांनी काम सुरु केले होते. मात्र, जो भाग गृहीत धरुन काम केले त्यातील 70 ते 80 टक्के भाग दुसर्या प्रभागात गेल्याने या इच्छुकांची 'पेरणी' वाया जाणार आहे.
प्रभागरचना प्रारूप यादीची मंगळवारी दिवसभर चर्चा होती. कुणाचा फायदा आणि कुणाचे नुकसान ही चर्चा सोशल मीडियावर रंगली. ज्यांचा मूळचा भाग कायम राहिला त्यांच्या प्रभाग क्रमांकासह छायाचित्रे व्हायरल झाली. नव्या दमाच्या इच्छुकांनीही यात उडी घेतली. ज्यांचा भाग बदलला त्यांनी माघार न घेता लगेचच दुसरा प्रभाग निवडून सोशल मीडियावर 'प्रचार' सुरू केल्याचे दिसून आले.
प्रभागरचनेतील बदल पथ्यावर पडल्याने अनेक विद्यमान स्वीकृत सदस्यांच्या आशा पल्लवीत झाल्याचे दिसून आले. गतवेळी तिकीट न मिळालेल्या नाराजांची स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागली होती. मात्र, आता पुढच्या दाराने महापालिकेत जाण्याची संधी म्हणून अनेक स्वीकृत सदस्य मंगळवारपासून मोठ्या उत्साहाने कामाला लागल्याचे दिसून आले.
प्रभाग बदलल्याने दुसर्या प्रभागात जाण्याशिवाय गत्यंतर नसले तरी काही इच्छुकांनी लगेचच दुसर्या प्रभागातून आपली उमेदवारी ठसविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांसमवेत बैठका रंगल्या, नव्या प्रभागाची चाचपणी सुरू झाली. काहींनी तर सोशल मीडियावर बदलेल्या प्रभागासह प्रचारही सुरू केल्याचे दिसून आले.
शहरातील त्या-त्या प्रभागात वरिष्ठ नगरसेवकाचा फायदा अन्य नगरसेवकांना झाला होता. मात्र, आता नव्याने झालेल्या प्रभाग रचनेत प्रभागाची मोडतोड झाली आहे. त्यामुळे आपला 'त्या' प्रभागातील 'तो' नेत्याचा भाग दुसर्या प्रभागात गेला आहे. त्या दिग्गजचा प्रभाग फुटल्याने त्या प्रभागात आपल्या सोबत आणखी एकाद्दुसरा नगरसेवक निवडून आणण्याचे आकडे कागदावरच
राहणार आहेत.