Lok Sabha Election: काँग्रेस हा लबाड लोकांचा पक्ष: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

Lok Sabha Election: काँग्रेस हा लबाड लोकांचा पक्ष: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर ते संविधान बदलतील असा प्रचार काँग्रेसचे लोक करीत आहेत. मात्र, काँग्रेस हा लबाड लोकांचा पक्ष असून, त्यांनी ७० वर्षे जम्मू काश्मिरमध्ये संविधान लागू केले नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आज (दि.११) आलापल्ली येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. (Lok Sabha Election)

 संविधानामुळेच चहा विकणारा माणूस पंतप्रधान होऊ शकला, असे खुद्द मोदी म्हणाले. पंतप्रधान होताच त्यांनी सर्वप्रथम संविधानाला वंदन केले. त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने संपूर्ण देश आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी राबविलेल्या विविध योजनांचीही माहिती दिली. (Lok Sabha Election)

याप्रसंगी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. सुधीर मुनगंटीवार हे मंत्री असताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केली होती. परंतु वडेट्टीवार मंत्री होताच त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवली. त्यामुळे आता चंद्रपुरातून गडचिरोली जिल्ह्यात दारुचा महापूर वाहत आहे, असे आत्राम म्हणाले. या सभेला अशोक नेते, माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, बाबूराव कोहळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (Lok Sabha Election)

हे ही वाचा:

Back to top button