‘दहशतवादाचा खात्‍मा करता येत नसेल तर आम्‍हाला सांगा’ : राजनाथ सिंहांचा पाकिस्‍तानला टोला | पुढारी

'दहशतवादाचा खात्‍मा करता येत नसेल तर आम्‍हाला सांगा' : राजनाथ सिंहांचा पाकिस्‍तानला टोला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानला दहशतवादाचा खात्‍मा करता येत नसेल तर आम्‍हाला सांगा. भारत दहशतवाद रोखण्‍यासाठी सहकार्य करण्‍यात तयार आहे, अशा शब्‍दांमध्‍ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी पाकिस्‍तानला टोला लगावला. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राजनाथ सिंह म्‍हणाले की, “दहशतवादाची मदत घेऊन भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम पाकिस्‍तानला भोगावे लागतील. पाकिस्तानने दहशतवादावर नियंत्रण ठेवले पाहिजे. पाकिस्तानला वाटत असेल की तो दहशतवादावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर त्‍यांनी शेजारी देश भारताकडून सहकार्य घेऊ शकतात, भारत दहशतवाद रोखण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे.”

मी माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकलो नाही…

ज्‍यांनी १९७५ मध्‍ये देशावर आणीबाणी लादली तेच आज आमच्‍यावर हुकूमशहा असल्याचा आरोप करता आहेत. आणीबाणीच्‍या काळात माझ्या आईला ब्रेन हॅमरेज झाला होता. मात्र त्‍यावेळी मी सरकारविरोधात केलेल्‍या आंदोलनामुळे अटकेत होतो. यावेळी काँग्रेस सरकारने मला पॅरोल दिला नाही. मी माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकलो नाही. माझी आई 27 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिली. मला तुरुंगात ठेवण्यात आले आणि शेवटच्या क्षणी माझ्या आईला भेटू दिले नाही, अशी आठवण सांगत यावेळी राजनाथ सिंह आईचे स्‍मरण करत भावूक झाले.

भारताच्‍या जमिनीवर कोणीही कब्जा करू शकत नाही

भारताची जमीन चीनने बळकावली आहे का? त्यावर उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या सरकारच्या काळात एक इंचही जमीन कोणी काबीज करू शकत नाही. आमची जमीन आम्ही कधीही जाऊ देणार नाही. पाक व्‍याप्‍त काश्‍मीर आमचा होता आणि राहील, असा पुनरुच्‍चारही त्‍यांनी केला.

दोनच दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांचे चीनने ‘नामांतर’ केल्याबद्दल अरुणाचल प्रदेशातील नामसाई भागात मंगळवारी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ते म्‍हणाले होते की, भारतानेही असेच केले तर चीनचा भूभाग आमचा होईल का? ईशान्येकडील राज्यातील 30 ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या हालचालीमुळे वास्तविकता बदलणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

 

 

Back to top button