नाशिक : त्र्यंबकराजाच्या शिवपिंडीचा वज्रलेप निखळला | पुढारी

नाशिक : त्र्यंबकराजाच्या शिवपिंडीचा वज्रलेप निखळला

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकराजाच्या शिवपिंडीचा व्रजलेप निखळल्याच्या वृत्ताची दखल घेत विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दखल घेत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष यांना तातडीचे पत्र पाठवत शिवलिंगाचे जतन आणि संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीने आवश्यक उपाययोजना करावी. 24 तास देखरेख सीसीटीव्हीच्या माध्यमातून करण्यात यावी. तसेच याबाबत कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. (Trimbakeshwer Jotirling)

शिवलिंगाचा वज्रलेप दिनांक १३ जानेवारी २०२४ सायंकाळी निघाल्याचे निदर्शनास आले. मात्र, याबाबत मंदिर ट्रस्ट प्रशासनाने गोपनीयता बाळगली. तथापि भाविकांच्या ही बाब लक्षात आली. गतवर्षीही व्रजलेप निखळला होता. त्या तुलनेने यंदा अल्प प्रमाणात वज्रलेप निघाला. गतवर्षी ५ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने मंदिर बंद ठेवून व्रजलेप प्रक्रिया केली. त्र्यंबकेश्वर मंदिर भारतीय पुरातत्त्व खाते यांच्या राष्ट्रीय संरक्षित स्मारकांच्या यादीत आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर हे राष्ट्रीय संरक्षित स्मारकांच्या यादीत आहे. मात्र, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झालेले आहे. वेळोवेळी या खात्याकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, ते ज्योतिर्लिंग आणि मंदिर वास्तूबाबत अगदीच बेफिकीर असल्याचे दिसून आले आहे. – ललिता शिंदे, माजी विश्वस्त

शिवलिंगाचे जतन करा : गोऱ्हे
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान येथील ज्योतिर्लिंगाच्या वज्रलेपास हानी पोहोचल्याचे निदर्शनास येत आहे. या शिवलिंगाची झीज पुन्हा होऊ नये म्हणून त्याचे जतन व संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करावे, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी देवस्थान व पुरातत्त्व विभागास दिले आहेत. गोऱ्हे यांनी याबाबत देवस्थान, नाशिकचे जिल्हाधिकारी व पुरातत्त्व विभागाला पत्र दिले आहे. या पत्रात या घटनेबाबत तत्काळ पुरातत्त्व खात्याशी संपर्क साधून श्रींच्या शिवलिंगास हानी पोहोचणार नाही, याबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्या. त्यामध्ये वैज्ञानिक सल्लागार सर्वेक्षणासाठी व वज्रलेपासाठी पुढील आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. शिवलिंगाचे जतन व संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीने होईल यासाठी आवश्यक उपाययोजना करून त्याची २४ तास निगराणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून करावी, याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उपसभापती कार्यालयास सादर करावी, असे निर्देश पत्रात देण्यात आले.

हेही वाचा:

Back to top button