सोलापूरचा कचरा कोल्हापुरात टाकणार्‍या ठेकेदाराला नोटीस! | पुढारी

सोलापूरचा कचरा कोल्हापुरात टाकणार्‍या ठेकेदाराला नोटीस!

कोल्हापूर, विशेष प्रतिनिधी : सोलापुरातील घातक जैविक कचरा कोल्हापुरात आणून जाळल्याप्रकरणी एस. एस. सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीला महापालिकेने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्याचप्रमाणे यासंदर्भात ठेकेदाराला यापूर्वी देण्यात आलेले दोन पूर्वपरवाने रद्द करण्यात आले आहेत. याप्रकरणी महापालिका आयुक्तांनीही आज दिवसभर महापालिकेच्या आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली.

एस. एस. सर्व्हिसेस या कंपनीकडे कोल्हापूर आणि सोलापूर महापालिका हद्दीतील जैविक कचरा निर्मूलन कामाचा ठेका आहे; मात्र कंपनीच्या कामामध्ये अनियमितता असल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देऊन सोलापूर येथील जैविक कचरा 15 दिवसांच्या आत नष्ट करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे एस. एस. सर्व्हिसेस या कंपनीने सोलापुरातील जैविक कचरा कोल्हापुरात आणून त्याची इथल्या कचरा डेपोत विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. दै. ‘पुढारी’मध्ये रविवारी (दि. 31) याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच एकच खळबळ माजली.

महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापालिका प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने दि. 31 मार्च रोजी सुट्टीचा दिवस असतानाही एस. एस. सर्व्हिसेस या जैविक कचरा निमूुलन कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसांत खुलासा करण्याचा आदेश दिलेला आहे.

दरम्यान, आजही महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी या प्रकरणी संपूर्ण आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलापूरचा जैविक कचरा कोल्हापुरात येत असताना महापालिकेची आरोग्य यंत्रणा गाफील कशी राहिली याबाबत आयुक्तांनी संबंधितांना जाब विचारून धारेवर धरले. तसेच एस. एस. सर्व्हिसेस या कंपनीला या कामाचा ठेका दिल्यापासून आरोग्य बिभागामार्फत संबंधित ठेकेदाराला कोणकोणते परवाने दिले गेले याचीही सखोल चौकशी केली. त्यावेळी संबंधित ठेकेदाराला बाहेरून जैविक कचरा इथे आणायला परवानगी देणारे 6 ऑक्टोबर 2023 रोजीचे एक पत्र होते.

या पत्रावर उपायुक्तांची सही होती. त्याचप्रमाणे काही बाबतीत ठेकेदाराला ना हरकत प्रदान करणारे आदेश व पत्रे होती. मात्र असा परवाना सक्षम अधिकार्‍यांशिवाय देता येत नसल्याचे कारण देत आज आयुक्तांनी हा परवाना रद्द केला. त्यामुळे यापुढे संबंधित ठेकेदाराला जैविक कचरा बाहेरून कोल्हापूर शहरात आणता येणार नाही. तसेच यापूर्वी आरोग्य विभागाकडून मिळालेले काही परवाने नव्याने घ्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे जरी अत्यावश्यक बाब असली तरी जिल्ह्याबाहेरील अन्य कोणत्याही शहरातून जैविक कचरा इथे आणता येणार नाही. तसे करायचे झाल्यास महापालिकेच्या सक्षम अधिकार्‍यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.

आयुक्तांकडून प्रकल्पाची पाहणी!

आयुक्तांच्या झाडाझडतीनंतर महापालिकेच्या काही अधिकार्‍यांनी आरोग्य विभागाच्या काही अधिकार्‍यांसमवेत या कचरा निर्मूलन प्रकल्पाची पाहणी केली. त्याबाबतचा अहवाल लवकरच आयुक्तांना सादर केला जाणार असून त्यानुसार कारवाई निश्चित केली जाणार आहे.

Back to top button