तडका : निष्ठा ठेवू तरी कुठे? | पुढारी

तडका : निष्ठा ठेवू तरी कुठे?

सध्या देशभर राजकारणाचा जो गदारोळ उभा राहिला आहे. त्यामुळे अनेक मनोरंजक प्रश्नही उभे राहिले आहेत. एकाच कुटुंबातील अनेक जण राजकारणामध्ये असतील तर साहजिकच ते राहतात एकाच घरात, परंतु सकाळी प्रचाराला बाहेर पडल्यानंतर आपापल्या पक्षाचा प्रचार करायला मोकळे होतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून समोर आली आहे. लोकसभेसाठी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार कंकर मुंजारे यांनी त्यांच्या आमदार पत्नी अनुभा यांना तत्काळ घर सोडण्यास सांगितले आहे. एकाच घरातून दोन पक्षांचा प्रचार चालणार नाही, असे या उमेदवाराचे म्हणणे आहे.

आपली पत्नी आमदार आहे, याचा अभिमान वाटण्यापेक्षा ती आपल्याविरुद्ध प्रचार करायला तयार झाली आहे, याचा बहुधा राग श्रीमान कंकर यांना आला असावा. आता तुमच्या मनात असा प्रश्न येईल की, आमदार पत्नीने लोकसभेसाठी पतीचा प्रचार करावा की काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करावा? याचे उत्तर असे आहे की, अनुभा या बालाघाट येथील काँग्रेसच्या एका विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. हा विधानसभा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघात येतो, तेथील आपल्या पक्षाचे उमेदवार सम्राट सरसवार यांचा प्रचार करणे त्यांना आवश्यक आहे. आमदार महोदया यांच्यापुढे आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा की त्याच्या विरोधात असलेल्या आपल्या पतीचा प्रचार करायचा, असा प्रश्न उभा राहिला होता आहे.

साहजिकच त्यांनी ज्या पक्षाचे आपण राजकारण करतो किंवा ज्या पक्षाच्या वतीने आपण आमदार आहोत, त्या पक्षाच्या उमेदवाराचा लोकसभेसाठी प्रचार करण्याचे ठरवले. उमेदवार श्रीमान कंकर स्वतःचा आणि आमदार सौ. अनुभा आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत; पण राहत एकाच घरात आहेत. आमदार पत्नीपुढे निष्ठा पतीवर ठेवायची की पक्षावर ठेवायची, असा प्रश्न उभा राहिला तेव्हा त्यांनी पक्षाला प्राधान्य दिले आहे. म्हणजे पाहा, लोकसभा निवडणुकांच्या राजकारणाने लोकांच्या संसारात पण विष कालवण्याचे काम केले आहे. घरे तर जागोजागी फुटली आहेतच; पण आता संसारही तुटायला लागले आहेत, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. भाऊ-भाऊ, वडील-भाऊ, काका-पुतणे, नणंद-भावजया राहतात एकाच घरात; परंतु सकाळी उठल्यानंतर आपापल्या उमेदवाराचा प्रचार करतात. साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिगत संबंधावर होत असणारच, कारण शेवटी राहायचे आहे एका घरातच. एकाच छताखाली राहून निष्ठा वेगवेगळ्या उमेदवारांसाठी ठेवताना सर्वांची तारांबळ उडत असेल, हे नक्की.

संबंधित बातम्या

अशी अनेक घरे महाराष्ट्रातही तुम्हाला पाहायला मिळतील. बीड जिल्ह्यामधील एक प्रसिद्ध राजकीय घराणे. या घरात एकूण तीन पक्षांचे मोठे नेते आहेत आणि ते तीनही पक्षांचे नेते राहतात एका छताखाली; परंतु सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचार आपल्या उमेदवाराचा करत असतात. ग्रामपंचायतीमध्ये हे सर्रास पाहिले जाते; परंतु यावर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मर्यादा ओलांडून नवीन प्रघात येत आहेत. विशेषत्वाने मध्य प्रदेशच्या बालाघाटचा हा किस्सा पुढे कसा होतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Back to top button