Raj Thackeray News | एकट्याच्या नावाने राजकारण योग्य नाही, राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा | पुढारी

Raj Thackeray News | एकट्याच्या नावाने राजकारण योग्य नाही, राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज राजकारणात कोण कोणत्या पक्षात हेच कळत नाही. मराष्ट्राच्या राजकारणात चिखल झालाय. राजकारणात युतीच्या केवळ चर्चा सुरू आहेत. मोदींच्या नावाने राजकारण होतंय ते चांगलं आहे. पण एकट्याच्या नावाने राजकारण योग्य नाही, असा निशाणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला आहे. डोंबिवली येथे आज (दि.२४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Raj Thackeray News)

तर तरुण तरुणी का येतील राजकारणात?

वरती  केंद्रात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून खाली जे वाट्टेल ते सुरु आहे ते चूकच आहे. आणि फक्त आजच्यापुरता विचार करून चालणार नाही. आज अनेक तरुण तरुणी राजकारणात येऊ इच्छित असतील तर त्यांच्यासमोर काय आदर्श आपण ठेवतोय? त्यांच्यासमोर जर शिवीगाळ करणारे, एकमेकांना वाट्टेल ते बोलणारे असे आदर्श असतील तर ते तरी का येतील राजकारणात?

जनतेनेच यांना वठणीवर आणावे लागेल

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, राज्यात पाण्याची प्रश्न गंभीर आहे, बेरोजगारी,महागाई यांसारखे महत्त्वाचे प्रश्न आहेत. पण दुसऱ्या बाजूला घाणेरडे राजकारण सुरू आहे. महाराष्ट्र हे सर्वात श्रीमंत राज्य परंतु, याच राज्यात वाईट स्थिती आहे. त्यामुळे लोकांनाच यांना वठणीवर आणावे लागेल, अन्यथा ह्यांना असंच वाटत राहणार की आमचं कोणीच वाकडं करणार नाही. आणि जनतेने वेळीच पाऊल उचललं नाही तर महाराष्ट्राचं राजकारण अजून गाळात जाईल. असेदेखील ठाकरे यांनी राजकीय लोकप्रतिनिंधीना उद्देशून म्हटले आहे. (Raj Thackeray News)

 …त्यांना आज महाराज आठवले का?

मी बोलताना विचार करूनच बोलतो. मी आधी बोलतो आणि नंतर तेच जगाला पटते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाचे अनावरण झाले. यावरून शरद पवार यांना आज महाराज आठवले का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. (Raj Thackeray News)

हेही वाचा:

Back to top button