Loksabha Election : शिरूर लोकसभेत राजकीय चर्चांचा उडतोय फुफाटा | पुढारी

Loksabha Election : शिरूर लोकसभेत राजकीय चर्चांचा उडतोय फुफाटा

ओतूर : लोकसभा निवडणुकीवरून शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय चर्चांचा रंगदार फुफाटा अणे माळशेज पट्ट्यातील गावागावांमधून उडू लागला असून, मतदारांची मोठी करमणूक होत आहे. कोणत्या पक्षाला जागा जाणार, मग कोण उमेदवार असणार, निवडणूक कधी होणार अशा निरनिराळ्या चर्चांसह उमेदवारांची नवनवीन नावे चर्चेत येत आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात राजकीय हालचालींना कमालीचा वेग आल्याचे दिसत आहे. सध्या महाराष्ट्रात भाजपासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष यांची युती असल्याने लोकसभेसाठी नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याची मोठी चर्चा मतदारांमध्ये आहे.

या निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची जादूची कांडी फिरणार का ? काय असेल आढळरावांची रणनीती ? डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा संधी मिळणार का ? अशा चर्चांना उधाण आले असतानाच यावेळी शिरूर लोकसभा निवडणूक रिंगणात नव्याने पार्थ पवारांचीही एंट्री होत असल्याची चर्चा आहे, त्यांच्या मातोश्री बारामती मतदारसंघात उभ्या राहणार आहेत असा मुद्दा निघाला की पार्थ यांचे नाव मागे पडत आहे. चर्चेने मात्र अवघे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पक्षाचे उमेदवार जोपर्यंत स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत मतदार राजा चर्चेचा आस्वाद घेतच रहाणार यात शंका नाही.

या वेळी लोकसभा निवडणुकीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात असणार याची उत्सुकता मात्र शिगेला पोहचली आहे. सद्यस्थितीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र सत्तेत सहभागी असल्यामुळे शिरूर लोकसभा उमेदवारी राष्ट्रवादी पक्षालाच मिळाली तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवर गदा येण्याच्या शक्यतेने चर्चा जोर धरू लागला आहे. असे झाले तर खा. आढळराव यांची नेमकी राजकीय भूमिका काय असेल हे कोणालाही सांगता येत नाही. शरद पवार गटाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवारांनी त्यांचे उमेदवार म्हणून नाव घोषित करताच प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

हेही वाचा

Back to top button