अशोक सराफ मराठी मातीतील अस्सल हिरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अशोक सराफ मराठी मातीतील अस्सल हिरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : अशोक सराफ हे मराठी मातीतला अस्सल हिरा आहेत. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करणे ही अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना गुरुवारी प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील एनएससीआय डोम सभागृहात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र भूषण आणि लता मंगेशकर पुरस्कारासोबतच स्व. राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही प्रदान करण्यात आले. या समारंभास सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार मनीषा कायंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि ज्येष्ठ निरुपणकार तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली. अशोक सराफ यांचे आडनाव जरी सराफ असले तरी त्यांची काही दागिन्यांची पेढी नव्हती. मात्र, त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर सोने, चांदी, हिरे, मोत्यांची अक्षरशः उधळण केली. नाटक, चित्रपट आणि कालांतराने टीव्हीवरही अवतरलेल्या अशोक सराफ यांनी अविस्मरणीय भूमिकांनी प्रेक्षकांची अभिरुचीही संपन्न केली. अशोक सराफ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरुन हसवले. त्यांच्या अभिनयाने आपले जगणे सुसह्य केले. हा सन्मान करून आपण त्याची परतफेड करत आहोत, अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सुरेश वाडकरांना दिवंगत लता दीदींनीच पहिल्यांदा गाण्याची संधी दिली होती. आज त्यांच्याच नावाचा पुरस्कार वाडकरांना मिळत आहे, हा विलक्षण योगायोग असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी वाडकरांचे अभिनंदन केले.

दोन्ही व्यक्तिमत्त्वे दिग्गज : फडणवीस

अशोक सराफ हे मराठी चित्रपटाचा चेहरा आहेत. त्यांनी टीव्ही, चित्रपट, नाटक अशा सर्व माध्यमात आपली अधिकारशाही गाजवली आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. अशोक सराफांनी साकारलेला नायक हा स्वप्नातला नायक नाही तर प्रत्यक्ष जीवनातला नायक आहे. त्यामुळे ते नेहमी लोकांना जवळचे वाटतात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सुरेश वाडकर यांनी आपले जीवन आनंदमय केले. सराफ आणि वाडकर ही दोन्ही व्यक्तिमत्वे दिग्गज आहेत, असेही त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news