परभणी : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान; शांताबाई नखाते आश्रमशाळा सेलू तालुक्यात प्रथम | पुढारी

परभणी : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान; शांताबाई नखाते आश्रमशाळा सेलू तालुक्यात प्रथम

सेलू , पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाकडून शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान सुरू आहे. या अभियानातील मुल्यांकनाच्या तालुकास्तरीय निकालात खासगी संस्था गटातून श्रीमती शांताबाई नखाते आश्रमशाळा वालूरचा आज (दि.२२) तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी गुणवत्ता, स्वच्छता आरोग्य, भौतिक सुविधा या बाबींचा उपक्रमात सामावेश होता. यामध्ये प्रथमतः केंद्रस्तरीय समितीने मुल्यांकन करून खासगी व जिल्हा परिषद गटातून प्रत्येकी १ शाळेची निवड केली. त्यानंतर सर्व केंद्रातील ९ खासगी व ९ जिल्हा परिषद शाळेचे मुल्यांकन गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, भुजंग थोरे, गजानन भिते, जनार्दन कदम, अरूण राऊत यांच्या तालुकास्तरीय समितीने केले. यामध्ये श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळा वालूरचा खासगी गटातून पहिला क्रमांक आला.

या आश्रमशाळेत संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते, सचिव भावनाताई नखाते, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक शाम मचाले, प्राचार्य रमेश नखाते, नोडल कर्मचारी रेवणअप्पा साळेगावकर यांच्यासह सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी गुणवता, स्वच्छता, आरोग्य, भौतिक सुविधा यासाठी अथक परिश्रम घेतले. हे अभियान यशस्वी केल्याने या आश्रमशाळेला तालुकास्तरावर पहिला क्रमांक मिळाला आहे.

या अभियानातून खासगी गटातून शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळा वालूर (प्रथम), प्रिन्स इंग्लिश स्कुल सेलू (द्वितीय), नूतन प्राथमिक शाळा सेलू (तृतीय) आली आहे. तर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद शाळा खवणे पिंपरी (प्रथम), जिल्हा परिषद शाळा पारडी (द्वितीय), जिल्हा परिषद केंद्रीय शाळा चिकलठाणा बु.या शाळेचा सामावेश आहे. या सर्व शाळा तालुकास्तरावरील प्रथम ३ लाख, द्वितीय २ लाख व तृतीय १ लाख अशा बक्षिसाला पात्र ठरल्या आहेत. तर तालुक्यात प्रथम आलेल्या श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळा वालूर आणि जिल्हा परिषद शाळा खवणे पिंपरी या शाळेची बुधवारी जिल्हास्तरावर समीतीकडून मुल्यांकन तपासणी करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button